कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजवर ६ गडी राखून मात केली. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने सध्या १-० अशी आघाडी घेतली आहे. विराटने ५० चेंडूत ९४ धावांनी खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. विराट आणि लोकेश राहुल यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने आपला विजय मिळवला. विराटला त्याच्या या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

याचसोबत विराटने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीला धोबीपछाड दिला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता पुढे गेला आहे. विंडीजविरुद्ध मिळालेला पुरस्कार हा विराटचा टी-२० क्रिकेटमधला बारावा पुरस्कार होता, आफ्रिदीच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ११ सामनावीर पुरस्कारांची नोंद आहे.

याचसोबत एका कॅलेंडर वर्षात ८ किंवा त्यापेक्षा जास्त सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या स्थानी कायम आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराटने दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान मिळवलं आहे.

या मालिकेतला दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतरपुरमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.