भारतीय क्रिकेट संघाचा आजपासून विंडीज दौरा सुरु होत आहे. या मालिकेची सुरुवात टी २० मालिकेने होणार आहे. या मालिकेत पहिले २ सामने अमेरिकेत होणार असून तिसरा सामना विंडीजमध्ये होणार आहे. या सामन्यात किंवा या मालिकेत कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनाही विक्रम खुणावत आहेत.

टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावे सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३३१ धावा आहेत. त्याने ९४ टी २० सामने खेळून हा पल्ला गाठला आहे. पण जर रोहित आजच्या सामन्यात फलंदाजीच्या बाबतीत दुर्दैवी ठरला, तर रोहितचा हा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीला मोडण्याची नक्कीच मिळणार आहे. विराट कोहलीच्या ६७ सामन्यांमध्ये २ हजार २६३ धावा आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित दुर्दैवाने शून्यावर बाद झाला, तर ६८ धावांचा पल्ला गाठून विराटला रोहितचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. मात्र विराटला सध्या टी २० धावांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलला मागे टाकण्याची नक्कीच शक्यता आहे. २ हजार २७२ धावांसह गप्टील दुसऱ्या स्थानी आहे टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावण्यासाठी कोहलीला १० धावांची गरज आहे.

याशिवाय, सर्व प्रकारच्या टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधीदेखील विराटकडे आहे. भारताचा सुरेश रैना ३०३ डावांत ८ हजार ३६९ धावांसह अव्वल स्थानावर आहे. या विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी विराटला २३ धावांची आवश्यकता आहे. त्याचसोबत लोकेश राहुलला टी २० क्रिकेटमध्ये एका हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १२१ धावांची गरज आहे. मुख्य म्हणजे या धावा त्याने पहिल्याच सामन्यात केल्या, तर टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावांचा विक्रम त्याच्या नावे होईल. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याच्या नावावर आहे. त्याने २६ डावात हजार धावा ठोकल्या होत्या. तर विराट कोहलीने २७ डावांत हजार धावा केल्या होत्या. लोकेश राहुलच्या २४ डावांत ८७९ धावा आहेत.

रोहित शर्मालादेखील एक विश्वविक्रम खुणावतो आहे. त्याला ‘सिक्सर किंग’ होण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. हा विक्रम करण्यासाठी रोहितला तीन षटकारांची गरज आहे. या यादीत ख्रिस गेल १०५ षटकारांसह अव्वल आणि मार्टिन गप्टील १०३ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.