अखेरच्या ट्वेन्टी-२० लढतीसह मालिका जिंकण्याचे लक्ष्य

पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील पराभवांनंतर सावरलेल्या भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील प्रवास हा आतापर्यंत जणू स्वप्नवत असाच राहिला आहे. वाँडर्सच्या कसोटीतील विजयानंतर एकदिवसीय मालिका ५-१ अशा फरकाने जिंकणाऱ्या भारतीय संघाला आता ट्वेन्टी-२० मालिकेतील विजय साद घालत आहे. आठ आठवडय़ांच्या या प्रदीर्घ दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवट शनिवारी होणाऱ्या निर्णायक सामन्यातील विजयासह सुखद शेवट करण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

जोहान्सबर्गला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने २८ धावांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर सेंच्युरियन येथे दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सहा विकेट राखून विजय मिळवल्याने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.

भारतीय संघ न्यूलॅण्ड्स येथे अद्यापि ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेची येथील कामगिरी ही फारशी समाधानकारक नाही. ते या मैदानावर आठ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत, मात्र पाच सामन्यांत ते पराभूत झाले आहेत. हीच भारतासाठी सकारात्मक गोष्ट ठरेल. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या मैदानावर दोन सामने जिंकले आहेत. मात्र द्विराष्ट्रीय मालिकेत एकमेव विजय त्यांनी २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवला आहे.

मागील सामन्यातील विजयानंतर जेपी डय़ुमिनीच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांविरुद्ध आपल्याकडे अप्रतिम योजना असून, फक्त ते योग्य रीतीने राबवण्याची आवश्यकता आहे, असे डय़ुमिनीने म्हटले आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही दुसऱ्या सामन्यात डय़ुमिनीने त्याच संघावर विश्वास दर्शवला होता. आता मालिकेतील निर्णायक सामन्यातसुद्धा विजयाचे सातत्य राखण्यासाठी संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. जॉन-जॉन स्मट्स अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी फटकेबाजी करू शकलेला नाही. डेव्हिड मिलर धावांसाठी झगडत आहे.

भारताच्या गोलंदाजीच्या फळीत कर्णधार विराट कोहलीला काही बदल करावे लागणार आहेत. पोटातील स्नायू दुखावल्यामुळे जसप्रीत बुमरा अखेरच्या सामन्यात खेळू शकणार नाही. जयदेव उनाडकट आतापर्यंत महागडा ठरला आहे. त्याने ९.७८च्या सरासरीने ७५ धावांत फक्त दोन बळी या मालिकेत घेतले आहेत. युजवेंद्र चहललासुद्धा आफ्रिकेच्या फलंदाजांनी चोप दिला आहे. त्याने ८ षटकांत १२.८७च्या सरासरीने १०३ धावा दिल्या आहेत.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार)़, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका : जेपी डय़ुमिनी (कर्णधार), फरहान बेहरादिन, ज्युनिअर डाला, रीझा हेंड्रिक्स, ख्रिस्तियान जोंकर, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डॅन पीटरसन, आरोन फांगिसो, अँडिले फेहलुकवायो, ताब्रेझ शाम्सी, जॉन-जॉन स्मट्स.

सामन्याची वेळ : रात्री ९.३० वा.पासून, थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.