भारतीय पुरुष हॉकी संघाने जरी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला असला, तरी वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे येथे आम्ही पर्यटनाला आलेलो नाही, तर जिंकायला आलो आहोत, असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने स्पष्ट केले.
वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेतून तीन संघांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे. काहींसाठी तर ही अखेरची संधी असल्याने त्यांच्याकडून कडवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भारताने गतवर्षी आशियाई स्पध्रेचे जेतेपद पटकावून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिक स्पध्रेत तसेच वर्षांअखेरीस होणाऱ्या वर्ल्ड लीग अंतिम स्पध्रेत स्थान पक्के केले आहे. त्यामुळे या स्पध्रेत नवोदित खेळाडूंची क्षमता अजमावण्याचा प्रयोग प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्याकडून होत आहे.
‘‘या स्पध्रेत आम्ही पर्यटक म्हणून आलेलो नाही, नक्कीच नाही. आम्ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो आहोत, परंतु वर्षांअखेरीस भारतात होणाऱ्या वर्ल्ड लीग अंतिम फेरीच्या दृष्टीने आम्हाला या स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. इतर संघांप्रमाणे या स्पध्रेत आम्हीही सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत,’’ अशी प्रतिक्रिया सरदार सिंग याने दिली.

पोलंडला कमी लेखणार नाही
वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने फ्रान्सवर दणदणीत विजय मिळवला असला तरी दुसऱ्या लढतीत त्यांचा सामना पोलंडशी होणार आहे. पोलंडने पाकिस्तानला विजयासाठी दिलेले आव्हान पाहता त्यांना कमी लेखण्याची जोखीम भारतीय संघ उचलणार नसल्याचे कर्णधार सरदार सिंग याने स्पष्ट केले. जागतिक क्रमवारीत पोलंड १७व्या, तर भारत ११ व्या स्थानावर आहे. तरीही पोलंडमध्ये असलेल्या क्षमतेची जाण सरदार सिंगला असून कोणत्याही क्षणी ते सामन्याचे चित्र बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून भारताला कडवी टक्कर मिळेल. फ्रान्सप्रमाणे पोलंडकडेही गतिमान खेळ करणारे स्ट्रायकर आहेत आणि ते भारताची बचावफळी सहज भेदू शकतात. त्याचा नजराणा त्यांनी पाकिस्तानविरुद्ध पेश केला होता. सरदार म्हणाला, ‘‘प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. जागतिक क्रमवारीचे मैदानावर खेळ करताना काहीच महत्त्व नसते.’’
वेळ : संध्याकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

देविंदर वाल्मीकीला एक लाख
नवी दिल्ली : वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीतील पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करणाऱ्या मुंबईकर देविंदर वाल्मीकी याला हॉकी इंडियाने एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. देविंदरने फ्रान्सविरुद्धच्या लढतीत एक गोल करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कामगिरीबाबत देविंदरचे अभिनंदन करताना हॉकी इंडियाचे सरचिटणीस मोह. मुश्ताक अहमद म्हणाले, ‘‘देविंदर शिस्तबद्ध खेळाडू आहे आणि कनिष्ठ कारकीर्दीत त्याची कामगिरी प्रभावी आहे. हॉकी इंडिया लीग, राष्ट्रीय स्पर्धा आणि सराव शिबिरातील सातत्यपूर्ण खेळाच्या बळावर त्याने राष्ट्रीय संघात स्थान पटकावले आहे.’’