विश्वचषकाचा महासंग्राम आता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. या महासोहळ्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानासह सहभागी होण्याचा बहुतांशी संघांचा मानस आहे. मात्र अव्वल स्थानासाठी खरी स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघातच आहे.
काही दिवसातच सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेच्या निमित्ताने मोठय़ा आघाडीसह अव्वल स्थान कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार आहे तर दिमाखदार कामगिरीसह ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थान काबीज करण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.
घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मात्र खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडला कामगिरीत सुधारणा करण्याची संधी आहे.
दुसरीकडे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजशी मुकाबला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत प्रभुत्व गाजवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आतूर आहे. विश्वचषकापूर्वी कामगिरीत सातत्य आणण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल.
विश्वचषकाचे सहयजमान असणाऱ्या न्यूझीलंडची रंगीत तालीम श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसह सुरू झाली आहे. घरच्या मैदानावर श्रीलंकेसारख्या मातब्बर संघाला चीतपट करण्याची संधी न्यूझीलंडला आहे. क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या श्रीलंकेला विश्वचषक होणार असलेल्या मैदानांवर आपली कौशल्ये घोटीव करून घेण्याची संधी आहे.