गेल्या दोन महिन्यांमध्ये एकही एकदिवसीय सामना न खेळणारा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत ११२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ११९ गुणांसह अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलिया (११८) आणि न्यूझीलंड (११३) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

जानेवारी महिन्यात भारतीय संघाने अखेरचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या देशांचे विश्वचषकात थेट प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ साली विश्वचषक जिंकला होता. पण सध्याच्या घडीला ८४ गुणांसह ते नवव्या स्थानावर आहेत. १९९२ साली विश्वचषक पटकावलेला पाकिस्तानचा संघ या क्रमवारीत ८९ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांच्या पुढे बांगलादेशचा संघ आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करत बांगलादेशने ९२ गुणांसह सातवे स्थान पटकावले आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डी’व्हिलियर्स अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या आणि भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थानावर आहे.

कोहलीला विस्डेनकडून सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सन्मान

नवी दिल्ली : भारताच कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. क्रिकेटजगतातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या विस्डेनने कोहलीला २०१६ या वर्षांसाठी सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सन्मान जाहीर केला आहे.

गेल्या वर्षांत कोहलीने ७५.९३च्या सरासरीने १२१५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर दहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ९२.३७च्या सरासरीने ७३९ धावा केल्या, त्याचबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १०६.८३च्या सरासरीने ६४१ धावा रचल्या होत्या. या वर्षांतील दमदार कामगिरीच्या जोरावर कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) पॉली उम्रीगर पुरस्कार पटकावला होता.

‘‘विस्डेनच्या २०१७च्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कोहलीचे छायाचित्र छापण्यात येणार आहे. २०१६ या वर्षांत त्याने ज्या धावा केल्या ते पाहता त्याला हा मान देण्यात आला आहे,’’ असे ‘विस्डेन’कडून सांगण्यात आले आहे.

कोहलीबरोबर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान या वेळी ऑस्ट्रेलियाच्या इलिस पेरीला देण्यात आला आहे. विस्नेडनने या वेळी सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली. यामध्ये पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हक आणि युनिस खान यांचा समावेश आहे. इंग्लंडच्या ख्रिस वोक्ससह बेन डुकेट आणि टॉबी रोलॅण्ड-जोन्स यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.