क्रिकेटचा प्रकार कोणताही असो, डेव्हिड वॉर्नरचा खेळण्याचा रुबाब मात्र सारखाच. मैदानावर मुक्तछंदात फलंदाजीची त्याची वृत्ती जरी धाडसी असली तरी ती ऑस्ट्रेलियाला साजेशीच. कसोटी क्रिकेटसारख्या धीरगंभीर प्रकारातही तो आक्रमणाचे हत्यार उगारत आपल्या बॅटने सपासप वार करीत गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतो. अ‍ॅडलेडच्या या भावनिक कसोटीत वॉर्नरने तितक्याच आत्मीयतेने हा प्रत्यय घडवताना १४५ धावांची दिमाखदार खेळी साकारून आपला सहकारी फिलिप ह्युजला हृदयस्पर्शी श्रद्धांजली अर्पित केली. उत्तरार्धात भारताने यजमानांना तीन धक्के देत झुंजार वृत्तीचे दर्शन घडवले.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आनंदाने प्रथम फलंदाजीचा मार्ग पत्करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या दहाव्या शतकाच्या बळावर दमदार प्रारंभ केला. धावांचा वेग पाहता ऑसी संघ दिवसअखेर चारशेपर्यंत सहज मारणार अशी लक्षणे दिसत होती, परंतु वॉर्नर बाद झाल्यावर धावांचा वेग मंदावला आणि उत्तरार्धात तीन फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाल्यामुळे अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ६ बाद ३५४ अशी स्थिती होती.
ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर २ बाद २५८ धावा झळकल्या असताना पदार्पणवीर फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने वॉर्नरला जेरबंद करीत आपल्या खात्यावरील पहिला बळी नोंदवला. सामन्याच्या अखेरच्या षटकांत मिचेल मार्श (४१), नाइट वॉचमन नॅथन लिऑन (३) आणि ब्रॅड हॅडिन (०) या फलंदाजांना तंबूची वाट दाखवत भारतीय संघ सामन्यात आशेने परतला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा स्टीव्हन स्मिथ ७२ धावांवर खेळत होता.
वॉर्नरची खेळी जितकी आक्रमक होती, तितकीच भावनाप्रधान. वॉर्नर जेव्हा वैयक्तिक ६३ धावांवर पोहोचला, तेव्हा त्याने आकाशाकडे पाहून ह्युजला वंदन केले. मग शतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरच्या भावनांचा बांध पुन्हा फुटला. आकाशाकडे पाहून पुन्हा त्याने ह्युजला अभिवादन केले. या वेळी अश्रूंनी डबडबलेल्या वॉर्नरला धीर देण्यासाठी मैदानावर समोरच्या टोकाला असलेला कर्णधार मायकेल क्लार्क पुढे सरसावला. क्लार्कने वॉर्नरची पाठ थोपटत त्याचा आत्मविश्वास वाढवला.
ह्युजच्या मृत्यूनंतर गेले दोन आठवडे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला समर्थपणे सावरणाऱ्या क्लार्कचे फलंदाजीला जाताना क्रिकेटरसिकांनी उभे राहून अभिवादन केले. क्लार्कने वॉर्नरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, परंतु ६० धावांवर असताना पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. क्लार्कने ८४ चेंडूंत नऊ चौकारांसह आपली खेळी उभारली, तर वॉर्नर १६३ चेंडूंचा सामना करून तब्बल १९ चौकारांची चौफेर आतषबाजी करीत माघारी परतला. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर मिड-विकेटला इशांत शर्माने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
वॉर्नरने भारताच्या वेगवान गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. वरुण आरोनला (२/९५) त्याने जोरदार फटकेबाजी केली. याशिवाय मोहम्मद शमी (२/८३) आणि फिरकीपटू कर्ण शर्मा (१/८९) यांच्या अननुभवाचाही त्याने चांगला फायदा घेतला.
१३व्या शिलेदाराला सन्मानपूर्वक मानवंदना
अ‍ॅडलेड : क्रिकेटरसिकांच्या हृदयात फिलिप ह्युज ‘सदैव ६३ धावांवर नाबाद’ राहील.. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मृत्यू पावलेल्या ह्युजचा संघातील ‘१३वा खेळाडू’ म्हणून समावेश करीत आगळा गौरव केला.. काही दिवसांपूर्वी शॉन अ‍ॅबॉटचा उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे ह्युज गंभीररीत्या जखमी झाला आणि दोन दिवसांनी इस्पितळात त्याची प्राणज्योत मालवली.. नेहमीच हसतमुखपणे वावरणाऱ्या ह्युजच्या सन्मानार्थ या कसोटीला भावनिक महत्त्व प्राप्त झाले होते.  ह्युजने आयुष्यात अखेरचे मैदान सोडले, तेव्हा तो ६३ धावांवर नाबाद होता. ही धावसंख्या गाठल्यावर डेव्हिड वॉर्नरने आभाळाकडे पाहून ह्युजला अभिवादन केले.
सामना सुरू होण्याआधी स्टेडियममध्ये क्रिकेटरसिकांनी उभे राहून ६३ सेकंद टाळ्यांचा गजर करीत ह्युजला श्रद्धांजली वाहिली. या वेळी बाहूंवर काळ्या रंगाचे आर्मबँड बांधलेले दोन्ही संघांती खेळाडू मैदानावर गोंदलेल्या ४०८ क्रमांकाच्या पुढे उभे होते. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्या जर्सीवर कसोटी खेळाडू क्रमांक ४०८ नमूद केले होते.

धावफलक
भारत (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धवन गो. इशांत ९, डेव्हिड वॉर्नर झे. इशांत गो. कर्ण शर्मा १४५, शेन वॉटसन झे. धवन गो. आरोन १४, मायकेल क्लार्क (दुखापतीमुळे निवृत्त) ६०, स्टिव्हन स्मिथ खेळत आहे ७२, मिचेल मार्श झे. कोहली गो. आरोन ४१, नॅथन लिऑन त्रिफळा गो. शमी ३, ब्रॅड हॅडिन झे. साहा गो. शमी ०, अवांतर (लेगबाइज ४, वाइड ४, नोबॉल २) १०, एकूण : ८९.२ षटकांत ६ बाद ३५४
बाद क्रम : १-५०, २-८८, २-२०६*, ३-२५८, ४-३४५, ५-३५२, ६-३५४
गोलंदाजी : मोहम्मद शमी १७.२-१-८३-२, वरुण आरोन १७-१-९५-२, इशांत शर्मा २०-४-५६-१, कर्ण शर्मा २३-१-८९-१, मुरली विजय १२-३-२७-०.