बेल्जियमवर १-० असा निसटता विजय
चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा

प्रारंभी घेतलेली आघाडी अखेपर्यंत टिकवत भारताने बेल्जियमवर १-० अशी मात केली आणि चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
बेल्जियमविरुद्ध मोठय़ा फरकाने विजयाची खात्री भारताला होती. पण १३व्या मिनिटाला केलेल्या गोलनंतर भारताची आणखी गोल करण्यात अपयश आले. बिरेन्द्र लाकराने चेंडू गुरमेल सिंगकडे पास केला. गुरमेलने लगावलेला चेंडू गोलजाळ्याला लागून बाहेर आला. उजव्या बाजूला उभ्या असलेल्या नितीन थिमय्याने पुन्हा चेंडू गोलजाळ्यात ढकलून भारताचे खाते उघडले. त्यानंतर भारताने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. बेल्जियमच्या भक्कम बचावफळीसमोर भारताला गोल करता आले नाहीत.
बेल्जियमला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण गोलरक्षक टी. आर. पोटूनूरीसह बचावफळीतील खेळाडू व्ही. आर. रघुनाथ आणि रुपिंदरपाल सिंग यांनी प्रतिस्पध्र्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. या विजयामुळे भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. २००४नंतर या स्पर्धेत पहिल्यांदाच सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय संघ आता १९८२नंतर पदकाच्या शर्यतीत आहे. भारताला उपांत्य फेरीत चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी झुंज द्यावी लागेल. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर २-० अशी मात केली.
प्रतिस्पर्धी खेळाडूवर हॉकीस्टिक उगारल्याबद्दल गुरविंदर सिंग चंडी याला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. ६४व्या मिनिटाला व्हिडियोद्वारे अपील केल्यानंतर पंचांच्या भोवती खेळाडू जमल्यामुळे भारताचा कर्णधार सरदारा सिंग याला दंड सुनावण्यात आला. भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी रघुनाथ आणि रुपिंदरपाल यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, ‘‘या दोघांनी अप्रतिम बचाव केला. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठल्यामुळे मी आनंदी आहे. आघाडीवीरांना चेंडूवर नियंत्रण मिळवताना अडचणी येत असल्यामुळे बचावपटूंवरील दडपण वाढले होते. यावर तोडगा काढावा लागणार आहे.’’ दरम्यान, शकील अब्बासीच्या दोन गोलांच्या बळावर पाकिस्तानने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीला २-१ असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली.