भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहली याच्यासंदर्भात दिलेल्या सल्ल्याचे भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी पालन केले आणि त्याचे अपेक्षित फळही त्यांना मिळाले. इंग्लंड दौऱ्यापासून धावांसाठी झगडणाऱ्या कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यावर सूर गवसला. त्यानंतर सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी धावांची बरसात केली. त्यामुळे भारताने ७ बाद २६३ धावांचे समाधानकारक आव्हान उभे केले. त्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांच्या साथीने विंडीजचा डाव फक्त २१५ धावांत गुंडाळला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ४८ धावांनी शानदार विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून संयमी फलंदाजीचे प्रदर्शन करीत आठ महिन्यांनंतर प्रथमच दिमाखदार अर्धशतकी खेळी साकारली. तर रैनाने ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशी फटकेबाजी केली. ३ बाद ७४ अशा बिकट स्थितीनंतर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रैनाने कलात्मक फलंदाजीचे दर्शन घडवताना ड्राइव्ह, लेट कट्स आणि रवी रामपॉलला खेचलेला उत्तुंग षटकार यांची अदाकारी पेश केली. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये धोनीनेही ४० चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा करीत आपले योगदान दिले. जेरॉम टेलरच्या अखेरच्या षटकात धोनीने एक षटकार आणि एक चौकार ठोकून आपले ५६वे अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावात ड्वेन स्मिथने ९७ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांनिशी ९७ धावांची खेळी साकारत कोचीची पुनरावृत्ती दिल्लीतसुद्धा करण्याची ग्वाही दिली. स्मिथ मैदानावर होता, तेव्हा विंडीजची २ बाद १७० अशी चांगली स्थिती होती. परंतु शमीने स्मिथचा त्रिफळा उडवून त्याचे शतकाचे स्वप्न भंग केले. विंडीजचे उर्वरित आठ फलंदाज फक्त ४५ धावांत माघारी परतले.
धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे झे. ब्राव्हो गो. सॅमी १२, शिखर धवन त्रिफळा गो. टेलर १, अंबाती रायुडू झे. सॅमी गो. बेन ३२, विराट कोहली झे. सॅम्युअल्स गो. रामपॉल ६२, सुरेश रैना झे. पोलार्ड गो. टेलर ६२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ५१, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. टेलर ६, भुवनेश्वर कुमार झे. पोलार्ड गो. ब्राव्हो १८, मोहम्मद शमी नाबाद १, अवांतर १८, एकूण ५० षटकांत ७ बाद २६३
बाद क्रम : १-४, २-५०, ३-७४, ४-१७९, ५-१९६, ६-२१९, ७-२४८
गोलंदाजी : रवी रामपॉल ८-०-४७-१, जेरॉम १०-०-५४-३, सुलेमान बेन १०-०-४७-१, ड्वेन ब्राव्हो ८-०-५१-१, डॅरेन सॅमी ४-०-१४-१, मार्लन सॅम्युअल्स ५-१-२१-०, आंद्रे रसेल ३-०-१४-०, किरॉन पोलार्ड २-०-१०-०.
वेस्ट इंडिज : ड्वेन स्मिथ त्रिफळा गो. शमी ९७, डॅरेन ब्राव्हो त्रिफळा गो. शमी २६, किरॉन पोलार्ड त्रिफळा गो. मिश्रा ४०, मार्लन सॅम्युअल्स झे. कोहली गो. यादव १६, दिनेश रामदिन झे. रैना गो. मिश्रा ३, ड्वेन ब्राव्हो झे. धवन गो. मोहम्मद शमी १०, आंद्रे रसेल यष्टीचीत धोनी गो. जडेजा ४, डॅरेन सॅमी त्रि.गो. जडेजा १, रवी रामपॉल झे आणि गो. मोहम्मद शमी १६, जेरोम टेलर झे. कुमार गो. जडेजा ०, सुलेमान बेन नाबाद ०, अवांतर २, एकूण ४६.३ षटकांत सर्वबाद २१५
बादक्रम : १-६४, २-१३६, ३-१७०, ४-१८३, ५-१८९, ६-१९५, ७-१९९, ८-१९९, ९-२०१, १०-२१५
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-३२-०, उमेश यादव ९-०-४२-१, मोहम्मद शमी ९.३-०-३६-४, रवींद्र जडेजा ९-०-४४-३, अमित मिश्रा १०-२-४०-२, विराट कोहली २-०-२०-०
सामनावीर : मोहम्मद शमी