क्वालालंपूर : भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाचा साखळीतील अंतिम सामना इंडोनेशियाशी होणार आहे. या सामन्यातील विजय किंवा बरोबरीदेखील भारताचा १६ वर्षांचा बाद फेरीतील दुष्काळ संपुष्टात आणू शकणार आहे.

एएफसी १६ वर्षांखालील संघाने यापूर्वी २००२ साली उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया करून दाखवली होती. त्यानंतर तब्बल दीड दशकाहून अधिक काळ भारताला ते शक्य झाले नव्हते. मात्र भारताचा युवा संघ सध्या बहरात खेळत असल्याने या संघाला शुक्रवारच्या सामन्यातून निश्चितपणे आशा बाळगता येईल. भारताच्या युवा संघाने यापूर्वी अर्जेंटिनासारख्या मोठय़ा संघाला पराभूत करुन दाखवले आहे. त्यामुळे हा संघ भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी बजावण्याची क्षमता राखून असल्याचे भाकीत वरिष्ठ संघाचे कर्णधार सुनील छेत्री यांनी नुकतेच केले आहे. भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही संघांना दोन सामन्यांमधून चार गुण प्राप्त झाले आहेत. मात्र इंडोनेशियाने अधिक गोल केले असल्याने क गटामध्ये ते भारतापेक्षा वरच्या म्हणजे अग्रस्थानी आहेत.

मजबूत दावेदारी

इंडोनेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला किंवा बरोबरी साधली तरी भारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यास पात्र ठरणार आहे. मात्र यदाकदाचित भारत पराभूत झाला तर मात्र भारताला बाहेर पडावे लागू शकते. अर्थात त्या स्थितीतही भारतासाठी एक आशेचा किरण आहे. तो म्हणजे त्याच वेळी होणाऱ्या इराण आणि व्हिएतनाम या सामन्यातही दोन्ही संघांची बरोबरी झाली तर मात्र भारताला इंडोनेशियाविरुद्धच्या पराभवानंतरही आगेकूच करता येईल. परंतु भारतीय संघाचे प्रशिक्षक बिबिआनो फर्नाडिस हे भारतीय संघाला विजयासाठीच खेळण्यास प्रेरित करतील.