२०२१ साली भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नवीन पर्यायांचा शोध सुरु केला आहे. या स्पर्धेचं यजमानपद पहिले भारताला मिळालं होतं, मात्र भारतीय सरकाकडून आयसीसीला कर सवलतीबद्दल कोणतही ठोस आश्वासन न मिळाल्याने आयसीसी आगामी स्पर्धेसाठी नवीन पर्यायांचा विचार करत असल्याचं समजतं आहे.

अवश्य वाचा – विराट आणि माझ्या मैत्रीवर भारत-पाक संबंधांचा परिणाम नाही – शाहिद आफ्रिदी

“बीसीसीआय आणि आयसीसीने वारंवार प्रयत्न करुनही भारत सरकारद्वारे आयसीसीच्या स्पर्धांना कर सवलतीचं धोरणं आखलं गेलं नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना सध्या दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहे.” आयसीसीने जाहीर केलेल्या स्पष्टीकरणात आपली बाजू मांडली आहे. २०१७ साली डिसेंबर महिन्यात झालेल्या विशेष बैठकीत बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद भारताला मिळाल्याची घोषणा केली होती. २०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता.

बीसीसीआय विरुद्ध क्रीडा मंत्रालय संघर्षात बीसीसीआयची बाजी, ‘नाडा’कडून क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी नाही – क्रीडा मंत्रालय

भारतीय सरकारसोबत आयसीसीची चर्चा अजुनही सुरु असली तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आयसीसीसने पर्यायी देशांचा विचार करायला सुरुवात केली आहे. भारत सरकारशी बोलणी फिस्कटल्यास भारताप्रमाणे वातावरण असलेल्या देशाला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद दिलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र भारताने या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क गमावल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं स्थान डळमळीत होऊ शकतं. त्यामुळे बीसीसीआय या प्रश्नातून कसा मार्ग काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.