क्रिकेटपटूंच्या उत्तेजक द्रव्य चाचणीवरुन गेल्या काही महिन्यांमध्ये, बीसीसीआय आणि क्रीडा मंत्रालयात सुरु असलेल्या संघर्षात अखेर बीसीसीआयने बाजी मारल्याची चिन्हं दिसतं आहेत. भारतीय क्रिकेटपटूंची ‘नाडा’मार्फत (National Anti Doping Agency) उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने रद्द केल्याचं समजतं आहे. बीसीसीआय, क्रीडा मंत्रालय आणि ‘नाडा’मधील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारानंतर क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला स्विडनस्थित खासगी संस्थेकडून उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे.

अवश्य वाचा – इंद्रा नुयींची क्रिकेटमध्ये एंट्री! आयसीसीच्या संचालकपदी निवड

“प्रत्येक खेळाडूची उत्तेजक द्रव्य चाचणी पार पडली जावी असं क्रीडा मंत्रालयाचं मत आहे. मग ही उत्तेजक द्रव्य चाचणी कोणत्या संस्थेने करावी यात क्रीडा मंत्रालयाला कोणताही आक्षेप नाही.” क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपल्या मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली. यानंतर क्रीडा मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, बीसीसीआयमध्ये उत्तेजक द्रव्य चाचणी नियमांनूसार पार पडली जात आहे की नाही एवढच क्रीडा मंत्रालयाला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ‘नाडा’सारख्या कोणत्याही संस्थेकडून क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा मंत्रालयाचा विचार नसल्याचंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘वाडा’ने (World Anti Doping Agency) आयसीसीला ‘नाडा’मार्फत बीसीसीआयशी संलग्न सर्व क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. ही चाचणी न झाल्यास ‘नाडा’ची मान्यता रद्द करण्याचा इशाराही ‘वाडा’च्या अधिकाऱ्यांनी दिला होता. यानंतर नोव्हेंबर महिन्यात क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी बीसीसीआयने ‘नाडा’च्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवावा असं आवाहन केलं होतं. “जर देशातील इतर क्रीडा संघटना नाडाच्या नियमांवलीनुसार उत्तेजक द्रव्य चाचणी करुन घेत असतील तर क्रिकेटपटूंनीही ही चाचणी करण्यास हरकत नाही.” क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचं हे आवाहन बीसीसीआयने धुडकावून लावलं होतं. आपण स्वायत्त संस्था असून, आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेतली जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.