भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांत सुधारणा होण्याची गरज असल्याचे मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सनथ जयसुर्या याने व्यक्त केले आहे. क्रिकेट हा खेळ दोन देशांना जवळ आणतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने व्हायला हवेत, असेही तो पुढे म्हणाला. दोन्ही देशांनी मैत्रिपूर्ण संबंध ठेवून पुढे जाण्यातच हित आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण एक क्रिकेटपटू म्हणून मला दोन्ही देशांतील क्रिकेट बंद होता कामा नये, असे वाटते. क्रिकेट आणि राजकारण यात फार मोठा फरक असल्याचेही जयसुर्या म्हणाला. वाढत्या दहशतवादी कारवायांचाही जयसुर्याने निषेध व्यक्त केला. मी एक क्रिकेटपटू आहे. त्यामुळे दहशतवादाच्या समस्येवर काय बोलायचे हे मला माहित नाही, पण मी अशा अमानवी कारवायांचा निषेध नक्कीच व्यक्त करू शकतो.
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांना एकाच गटात न ठेवण्याची मागणी बीसीसीआयकडून आयसीसीला करण्याची आल्याचेही वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. तर पाकिस्तानचे क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि सईद अजमल यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांवर सीमेवरील तणावाचा कोणताही परिणाम होणार नाही, सामने कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला होता.
सनथ जयसुर्याने आपल्या कारकीर्दीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही क्षेत्रात श्रीलंकेसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. जयसुर्याने श्रीलंकेसाठी ४४३ एकदिवसीय सामने खेळले असून १३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, तर ३२३ विकेट्स त्याच्या नावावर जमा आहेत.