आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना, क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जर भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास बंदी घातली असेल, तर ती बंदी पूर्णपणे असावी. तात्पुरत्या बंदीचा उपयोग काय असा सवाल गंभीरने विचारला आहे. तो टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलत होता.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : भारतासाठी वेगळे नियम का? – पाक कर्णधार सरफराज अहमद

“एखाद्या देशाविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल तर तो पूर्णपणे घ्यायला हवा. मग भले हे सामने आशिया चषकातले असो किंवा विश्वचषकातले…. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बंदी घालू शकत नाही, आम्ही दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका खेळणार नाही पण ICC आणि आशिया चषकातले सामने आम्हाला खेळावे लागतील या भूमिकेला काहीही अर्थ उरत नाही.” गंभीरने आपलं परखड मत मांडलं. जर तुम्ही पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकात सामने खेळत असाल तर मग दोन देशांमध्ये मालिका खेळण्यास काय हरकत आहे? सरकार आणि BCCI ने असा कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं गंभीर म्हणाला.

२०१३ पासून भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात क्रिकेट सामने खेळत नाहीयेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचं कारण देत भारत सरकारने दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिकेला परवानगी नाकारली आहे. एक खेळाडू म्हणून या दोन्ही देशांमधले सामने सुरु व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचं गंभीर म्हणाला. आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही गंभीरने भारताला आपली पसंती दिली आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी भारत संघात करु शकतो हे २ बदल