ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची पात्रता पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या एम.सी.मेरी कोम बॉक्सरकरिता विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान देण्यासाठी भारतीय संघटक प्रयत्न करणार आहेत.
जागतिक स्पर्धेतील ५१ किलो गटात मेरी कोम हिला दुसऱ्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळविणे अनिवार्य होते.
बॉक्सिंगकरिता नियुक्त केलेल्या अस्थायी समितीचे अध्यक्ष किशन नरशी यांनी सांगितले, मेरी कोम ही केवळ भारताची नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आदर्श खेळाडू मानली जाते. तिने जागतिक स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. गतवेळच्या ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदकही मिळविले होते. तिचा अर्ज आम्ही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे पाठविला आहे.
ऑलिम्पिकमधील महिलांच्या विभागात ५१ किलो, ६० किलो व ७५ किलो हे वजनी गट असून या तीन गटांत मिळून केवळ एकच विशेष प्रवेशिका निश्चित केली जाते. या महिन्यात अझरबैजानमध्ये पुरुषांची पात्रता स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर महिलांच्या विशेष प्रवेशिकेबाबत निर्णय होणार आहे. आतापर्यंत भारताचा शिवा थापा (५६ किलो) हा एकच खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.