बर्मिगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत पदकांची गणना

भारताला जानेवारी २०२२मधील राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. तसेच त्या स्पर्धामधील पदकांचा समावेश हा २०२२मध्ये बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करण्यात येईल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या वतीने (सीजीएफ) स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थातच पदकांचा समावेश हा बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर आठ दिवसांनी करण्यात येणार आहे.

बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी आणि तिरंदाजी हे दोन खेळ पर्यायी खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले. परिणामी भारताने बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवरभारताला राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. या दोन्ही स्पर्धा भारतात चंडीगड येथे जानेवारी २०२२मध्ये होतील. बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहेत.

‘‘चंडीगड २०२२ आणि बर्मिगहॅम २०२२ या दोन स्पर्धाचे स्वतंत्ररीत्या आयोजन होणार आहे. बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपायच्या एक आठवडा आधी पदक तालिका घोषित करण्यात येईल. त्यात चंडीगड २०२२मधील पदक विजेत्यांचा समावेश करण्यात येईल. अर्थातच त्यानंतर स्पर्धेतील सहभागी देशांची क्रमवारी ठरवण्यात येईल,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी जुलै २०१९मध्ये भारताने नेमबाजीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मुख्य खेळांमधून वगळण्यात आल्यावर बहिष्काराचा इशारा दिला होता. मात्र राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात भेट देऊन भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या वेळेस ‘आयओए’कडून स्वतंत्र राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला मान्यता मिळाल्यानंतरच ‘आयओए’ने अखेर बहिष्काराचा इशारा मागे घेतला. राष्ट्रकुल नेमबाजीचा बराचसा खर्च राष्ट्रीय रायफल संघटनेकडून करण्यात येणार आहे याउलट राष्ट्रकुल तिरंदाजी स्पर्धेचा खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येणार आहे.

भारताला या स्पर्धासाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आणि जागतिक तिरंदाजी महासंघाकडून प्रोत्साहन मिळाले आहे. १९६६ पासून प्रत्येक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी समाविष्ट आहे. त्याला अपवाद एडिनबर्ग येथील १९७०मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आहे. त्यामध्ये नेमबाजी समाविष्ट नव्हता. तिरंदाजीचा समावेश फक्त १९८२ ब्रिस्बेन आणि २०१० नवी दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धामध्ये झाला आहे.

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली त्याचा आनंद आहे. राष्ट्रकुल क्रीडा चळवळीसाठी राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा हे एक यशस्वी पाऊल असेल. राष्ट्रकुलमधील सहभागी खेळाडूंसाठीही जागतिक स्तरावर एक चांगले व्यासपीठ या नवीन स्पर्धेमुळे उपलब्ध झाले आहे.

– निरदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष