केप टाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं आहे. आफ्रिकेचा पहिला डाव २८६ धावांमध्ये आटोपला आहे. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ४ गडी घेत आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला मोठं खिंडार पाडलं. यानंतर मधल्या फळीतल्या काही फलंदाजांनी काहीकाळासाठी भागीदाऱ्या रचत आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मात्र चहापानानंतरच्या सत्रानंतर आफ्रिकेचा डाव ठराविक अंतराने पुन्हा गडगडला.

रविचंद्रन आश्विनने तळातल्या २ फलंदाजांना बाद करत आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. याव्यतिरीक्त हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी १-१ बळी मिळाला. दुसरीकडे भारताच्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. मुरली विजय, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली हे ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था २८/३ अशी झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळात चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा हे भारताचा डाव कसा सावरतात हे पहावं लागणार आहे.

  • अखेर पहिल्या दिवसाचा खेळ पंचांनी थांबवला, भारताची धावसंख्या २८/३
  • मात्र मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉककडे झेल देत विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का
  • कोहली-पुजारा जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • ठराविक अंतराने शिखर धवन डेल स्टेनच्या गोलंदाजीवर बाद, भारताला दुसरा धक्का
  • फिलँडरच्या गोलंदाजीवर मुरली विजय माघारी, भारताला पहिला धक्का
  • मात्र संथ सुरुवात करणाऱ्या मुरली विजया माघारी धाडण्यात आफ्रिकेला यश
  • सुरुवातीच्या काही षटकांमध्ये शिखर धवनचा आफ्रिकन गोलंदाजांवर हल्लाबोल
  • मुरली विजय – शिखर धवन जोडीकडून भारतीय डावाची सावध सुरुवात
  • मॉर्ने मॉर्केलला बाद करुन आश्विनने आफ्रिकेचा पहिला डाव २८६ धावांमध्ये संपवला
  • रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर कगिसो रबाडा बाद, आफ्रिकेला नववा धक्का
  • आफ्रिकेची धावसंख्या २५० च्या पार
  • केशव महाराज- कगिसो रबाडा जोडीची आणखी एक भागीदारी
  • शमीने उडवला फिलँडरचा त्रिफळा, आफ्रिकेला सातवा धक्का
  • ठराविक अंतराने फटकेबाजी करणाऱ्या फिलँडरला माघारी धाडण्यात भारताला यश
  • फिलँडर आणि डी-कॉकमध्ये सातव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी
  • भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉक बाद, आफ्रिकेला सहावा धक्का
  • आफ्रिकेने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी, डी-कॉक आणि फिलँडर जोडीचा लढा सुरुच
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर कर्णधार डु प्लेसीस माघारी
  • आफ्रिकेचे ४ गडी माघारी, भारताचं सामन्यात पुनरागमन
  • अखेर डिव्हीलियर्सला माघारी धाडण्यात भारताला यश, बुमराहची कसोटी क्रिकेटमधली पहिली विकेट
  • दरम्यान डु प्लेसीस आणि डिव्हीलियर्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत बुमराहने नो बॉल टाकल्याचं कळताच भारताचं अपील फेटाळलं
  • बुमराहच्या गोलंदाजीवर डु प्लेसीस झेलबाद असल्याचं भारतीय खेळाडूंचं अपील
  • पहिल्या सत्रापर्यंत दोघांमध्ये ९५ धावांची नाबाद भागीदारी, दक्षिण आफ्रिका १०७/३
  • दक्षिण आफ्रिकेने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • एबी डिव्हीलियर्सचं अर्धशतक, कर्णधार डु प्लेसीसचीही उत्तम साथ
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी
  • एबी डिव्हीलियर्स आणि कर्णधार फाफ डु प्लेसीसने आफ्रिकेचा डाव सावरला
  • आफ्रिकेला तिसरा धक्का, पहिल्या सत्रात यजमान संघाची घसरगुंडी
  • भरवशाचा हाशिम आमला यष्टीरक्षक साहाकडे झेल देत माघारी
  • केप टाऊनच्या खेळपट्टीवर भुवनेश्वरची टिच्चून गोलंदाजी
  • एडन मार्क्रमला माघारी धाडत भुवनेश्वरचा आफ्रिकेला दुसरा धक्का
  • भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर डीन एल्गर माघारी
  • भारताची आक्रमक सुरुवात, दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का
  • भारतीय संघात रहाणेला स्थान नाही, रोहित शर्मा – जसप्रीत बुमराहला संधी
  • नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय