भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना, भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आफ्रिका दौऱ्यात पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही असं दिसतंय. सध्या दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश महत्वाच्या शहरांना दुष्काळ आणि पाणी टंचाईने ग्रासलं आहे. या कारणामुळे आफ्रिकेच्या संघाला फायदा होईल अशी खेळपट्टी बनवणं अवघड असल्याचं मैदानातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

अवश्य वाचा – डी’व्हिलियर्सबद्दल आदर, पण तो आमच्या रडारवर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली कसोटी ५ जानेवारीपासून केप टाऊनच्या न्यू लँड्स मैदानावर खेळवली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना एका दिवसाला ८७ लिटरच्या वर पाणी वापरण्यास मनाई केली आहे. केप टाऊनच्या मैदानावर बोअरवेलच्या पाण्याची सोय आहे. मात्र केप टाऊनच्या मैदानाचे क्युरेटर इवन फ्लिंट यांनी ESPNcricinfo या वेबसाईटला दिलेल्या माहितीनूसार, पहिल्या कसोटीची खेळपट्टी ही आफ्रिकेच्या संघाला फायदेशीर ठरेल याची खात्री देता येणार नाही.

अवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेची ‘स्टेन’गन परतली, भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर

फ्लिंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मैदानातले कर्मचारी पाणीटंचाईमुळे आठवड्यातून केवळ २ वेळा मैदानावर पाणी मारु शकतायत, त्यामुळे केप टाऊनची खेळपट्टी हिरवीगार आणि स्टेन, मॉर्कल, फिलँडर यासारख्या गोलंदाजांना मदत करेल अशी राहणार नाही. येत्या दोन दिवसांमध्ये सकाळी पावसाची हलकी सर पडून नंतर प्रखर उन पडल्यास आम्ही कदाचीत नेहमीप्रमाणे खेळपट्टी तयार करु. मात्र या सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्याचंही फ्लिंट यांनी मान्य केलं. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारतीय संघ आफ्रिकेच्या तोफखान्याचा कसा सामना करतो हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – २०१८ साल माझं असेल – अजिंक्य रहाणेला आत्मविश्वास