पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

हैदराबाद : विश्वचषक स्पर्धेसाठीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रयोग केले जाणार आहेत. मात्र ट्वेन्टी-२० सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याचे उद्दिष्ट भारतीय संघाने बाळगले आहे.

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विश्वचषकाची संघबांधणी करण्यासाठी कंबर कसली असून शनिवारपासून हैदराबाद यथील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चार खेळाडूंवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकेश राहुल, ऋषभ पंत, विजय शंकर आणि सिद्धार्थ कौल या चार खेळाडूंमध्ये विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस रंगली आहे. दिनेश कार्तिक या शर्यतीतून काहीसा बाजूला पडला असला तरी त्याला या संघात स्थान मिळेल, असा अनेकांना विश्वास वाटत आहे.

राहुल, पंत, शंकर आणि कौल यांच्यासाठी पुढील पाच सामने ‘करो या मरो’ अशा स्थितीतील असतील. राहुलने भारतीय संघात पुनरागमन करताना दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत अनुक्रमे ५० आणि ४७ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे त्याला सलामीच्या जागेसाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सलामीसाठी शिखर धवनला सूर गवसला नसेल त्या वेळी राहुलचे संघातील स्थान निश्चित होईल.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऋषभ पंत सातत्याने कामगिरी करत नसला तरी त्याच्यातील गुणवत्ता आणि एकहाती सामनाजिंकून देण्याची क्षमता या गुणांमुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर प्रभावित आहे. त्यामुळेच पंतविषयी अंतिम निर्णय घेण्याआधी त्याला आणखीन संधी दिली जाणार आहे. विजय शंकर गोलंदाजीत छाप पाडू शकला नसला तरी हार्दिक पंडय़ाच्या दुखापतीमुळे तो या शर्यतीत टिकून आहे. संघ व्यवस्थापनाच्या यादीत पंडय़ाने पहिले स्थान पटकावले असले तरी अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानासाठी तो दावेदार समजला जात आहे.

सिद्धार्थ कौलने राखीव वेगवान गोलंदाज म्हणून संघात प्रवेश मिळवला असला तरी त्याचा प्रतिस्पर्धी खलिल अहमदला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विश्वचषकासाठी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांचे स्थान निश्चित असले तरी कौलला आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे.

अंबाती रायुडू, अष्टपैलू केदार जाधव आणि शमी भारतीय संघात परतल्यामुळे भारताची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने ट्वेन्टी-२० मालिकाजिंकली असली तरी एकदिवसीय मालिकेत त्यांच्यासमोर कडवे आव्हान असणार आहे. कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्यावर गोलंदाजीची धुरा असून केदार जाधवही फिरकीसाठी उपयुक्त ठरत आहे.

भारतावर एकमेव ट्वेन्टी-२० मालिका विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे मनोधैर्य उंचावले आहे. नॅथन लिऑनच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाजी बळकट झाली असून लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाही चांगली कामगिरी करत आहे. जायबंदी झालेल्या केन रिचर्डसनच्या जागी अखेरच्या क्षणी अँड्रय़ू टाय याला संधी मिळाली असली तरी आयपीएलमधील अनुभवाचा त्याला फायदा उठवता येईल.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

धोनीच्या मनगटाला दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सराव करत असताना महेंद्रसिंग धोनीच्या मनगटाला दुखापत झाली आहे. सहप्रशिक्षक राघवेंद्र यांनी फेकलेला चेंडू धोनीच्या उजव्या हाताच्या मनगटाला लागला असून त्यामुळे धोनीला वेदना होत आहेत.  शुक्रवारी नेटमध्ये फलंदाजीचा कसून सराव केल्यानंतर धोनी संघ व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांनी फेकलेले चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू मनगटाला आदळल्यानंतर धोनीने फलंदाजीचा सराव केला नाही. धोनीची दुखापत कितपत गंभीर आहे किंवा तो शनिवारी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार का नाही, हे अद्याप कळू शकलेले नसले, तरी याबाबतचा निर्णय शुक्रवारी रात्री घेतला जाणार आहे.धोनी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसला तर ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. मात्र धोनी वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे.

२ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया संघ २००७ आणि २००९ मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला असून हे दोन्ही सामने पाहुण्या संघानेजिंकले आहेत.

१९२ रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १९२ धावांची आवश्यकता आहे. रोहितने १९५ सामन्यांमध्ये ७८०८ धावा केल्या आहेत.

१० रवींद्र जडेजाला २००० धावांचे शिखर पार करण्यासाठी अवघ्या १० धावांची आवश्यकता आहे. २ हजार आणि १०० पेक्षा जास्त बळी मिळवणारा तो कपिलदेव, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि युवराज सिंगनंतरचा भारताचा सहावा खेळाडू ठरणार आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डी’आर्सी शॉर्ट, शॉन मार्श, मार्कस स्टॉइनिस, उस्मान ख्वाजा, अ‍ॅलेक्स कॅरे, पीटर हँडस्कॉम्ब, अ‍ॅश्टन टर्नर, अ‍ॅडम झाम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ, झाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, अँड्रय़ू टाय, नॅथन कुल्टर-नाइल, नॅथन लिऑन.