दोन्ही संघ मालिका विजय मिळवण्यासाठी उत्सुक ल्ल चिन्नास्वामीवर आज अखेरचा एकदिवसीय सामना
पहाटे उठून उटणे लावण्याचा कार्यक्रम होईल, त्यानंतर दिवाळीतील अभ्यंगस्नान होईल, फराळावर ताव मारून फटाक्यांची आतषबाजीही होईल, पण त्यानंतर दुपारी खऱ्या अर्थाने फटाकेबाजी अनुभवता येईल ती एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सातव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने. आतापर्यंत सहा सामन्यांपैकी दोन सामने पावसाने वाहून गेले, तर दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्याने हा सामना जो संघ जिंकेल त्याच्या गळ्यात मालिका विजेतेपदाची माळ पडेल. दोन्ही संघांतील फलंदाजांवर विजय अवलंबून असेल. आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये जवळपास २५०० धावा कुटल्या गेल्या असून, गोलंदाजांचा बार फुसका ठरलेला आहे. त्यामुळे शनिवारच्या सामन्यातही जोरदार फटकेबाजी करून देशवासीयांचे तोंड गोड करून त्यांना दिवाळीची छानशी भेट देण्याचा दोन्ही संघांचा मानस असेल. ही खेळपट्टीही फलंदाजीसाठी पोषक असून या सामन्यातही ३५० धावांचे आव्हान पेलवले जाऊ शकते.
आतापर्यंत भारताने या मालिकेत जयपूर आणि नागपूरमध्ये ३५० धावांच्या पुढचे आव्हान सहीसलामत पार केले आहे. मालिकेत विराट कोहलीने धावांचा ‘पाऊस’ पाडला आहे आणि या सामन्यातही हा पाऊस बरसावा अशीच भारतीय संघाची अपेक्षा असेल. शिखर धवननामक ‘ताजमहल’च्या माळेने आतापर्यंत तडतडत एकामागून एक धावांची लूट केली आहे. अखेरच्या सामन्यात या माळेचा पैसावसूल आवाज यायला हवा, अशीच संघाची आशा असेल. रोहित शर्मा हे भारतीय संघातील ‘रॉकेट’ सुसाट असून त्याचा वेग असाच राहावा, हीच संघाची इच्छा असेल. कर्णधार महेंद्रसिंग नावाच्या ‘चक्रा’ची छाया संघावर कायम असून ती अशीच राहिली तर नक्कीच भारतीय संघ दिवाळी साजरी करू शकेल. सुरेश रैना आणि युवराज सिंग हे आतापर्यंत ‘फुटके बार’ म्हणून समोर आले असून त्यांना आपले नाणे वाजवायची ही अखेरची संधी असेल. गोलंदाजीमध्ये एकालाही लौकिकाला साजेशी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली हा प्रत्येक सामन्यात ‘रस्सी बॉम्ब’च्या ताकदीची खेळी खेळताना दिसत आहे, तर त्याला आरोन फिन्चची चांगली साथ मिळताना दिसत आहे. नागपूरमधील सामन्यात शेन वॉटसनसारखा संघाला सावरणारा ‘पॅराशूट’ फॉर्मात आला असून अंतिम फेरीत त्याच्याकडून संघाला मोठय़ा आशा असतील. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही साफ निराशा केलेली आहे. त्यामुळे
त्यांच्यासाठीही गोलंदाजीचा प्रश्न गहन
असेल.
दोन्हीही संघांनी आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये तुल्यबळ अशीच कामगिरी केली आहे. दोन्ही संघांसाठी गोलंदाजी डोकेदुखी ठरत असून फलंदाजांवर संघाचा विजय अवलंबून असेल. त्यामुळे फलंदाजांच्या जोरावरच कोणता संघ दिवाळी साजरी करतो आणि कोणाचे दिवाळे निघते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, आर. विनयकुमार, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, मोहम्मद शामी.
ऑस्ट्रेलिया संघ : जॉर्ज बेली (कर्णधार), ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), फिलिप ह्य़ुजेस, आरोन फिन्च, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, अॅडम व्होग्ज, कॅल्युम फग्र्युसन, मोइझेस हेन्रिक्स, मिचेल जॉन्सन, क्लिंट मकाय, जेम्स फॉल्कनर, झेव्हियर डोहर्टी, नॅथन कल्टर-निले.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.
वेळ : दुपारी १.३० वा. पासून.