पहिल्या कसोटीमध्ये मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे मोम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर गेला. दुखपतग्रस्त शमीच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली. भारतीय संघानं दाखवलेला विश्वास सिराजनं सार्थ ठरवाल आहे. सिराजच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया संघाच्या मधल्या फळीनं गुडघे टेकले. सिराजनं महत्वाचे दोन बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली आहे.

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी धाडलं. शुबमन गिलने लाबुशेनचा सुरेख झेल घेतला. लाबुशेनने ४८ धावांची खेळी केली. त्यानंतर कॅमरुन ग्रीनलाही सिराजनं माघारी धाडलं. कॅमरुन ग्रीन पायचीत बाद झाला त्यानं १२ धावांची खेळी केली.

सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी गुडघे टेकले. अश्विन, बुमराह आणि सिराज यांनी भेदक मारा केला. १५५ धावांत ऑस्ट्रेलियाचे सात गडी माघारी परतले आहेत. सिराजनं आतापर्यंत १५ षटकांत ४० धावा देत २ बळी मिळवले आहेत.

सलामीवीर शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००१ नंतरची तिसऱ्यांदा दोन किंवा अधिक भारतीय खेळाडूंना देशासाठी परदेशी भूमीवर एकाच वेळी पदार्पणाची संधी मिळाली आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि दीप दास गुप्ता यांनी २००१ मध्ये एकत्र पदार्पण केले होते. याशिवाय २०११ मध्ये विराट कोहली, अभिनव मुकुंद आणि प्रवीण कुमार यांनी एकत्र कसोटी पदार्पण केले होते.