भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या. भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले.

लंडनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कूक आणि जेनिंग्स यांनी इंग्लंडला अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण त्यानंतर पहिल्या सत्रात सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या सत्रात मात्र भारताला एकही गडी बाद करता आला नाही. आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले. तो ७१ धावांवर बाद झाला. लगेचच कर्णधार जो रूट आणि पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर तंबूत परतले.

यानंतर सामन्यावर पकड घेतलेली पाहून शिखर धवनने सामना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्यांना, मैदानात भांगडा करुन दाखवला. त्याचा हा नाच सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. इतकच नव्हे तर शिखरचा हा नाच पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या समालोचकांनीही भांगडा करण्याचा प्रयत्न केला.