भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत दमदार पुनरागमन करताना ‘अ’ गटातील दुसऱ्या लढतीत मलेशियावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. बचावपटू गुरजित कौरने दोन गोल करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला, तर तिला कर्णधार राणी रामपाल आणि लाल्रेम्सीयामी यांनी प्रत्येकी एक गोल करत उत्तम साथ दिली.

कौरने ६ आणि ३९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. राणी आणि लाल्रेम्सीयामी यांनी अनुक्रमे ५६ व ५९व्या मिनिटाला मैदानी गोल केले. अखेरच्या दहा मिनिटांत मलेशियाचे दोन खेळाडू जायबंद झाल्याचा पुरेपूर फायदा भारतीय खेळाडूंनी उचलला. सलामीच्या लढतीत वेल्सकडून झालेल्या पराभवानंतर मिळवलेला हा विजय भारतीय खेळाडूंचा मनोबल उंचावणारा ठरला. मलेशियासाठी नुराइनी रशीदने ३८व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

‘‘या विजयामुळे खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. मध्यंतरानंतर आम्ही उत्तम खेळ केला. मलेशियाकडून पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात कडवी झुंज मिळाली. स्पध्रेचा पहिला दिवस आमच्यासाठी निराशाजनक होता. मात्र, खेळात जय-पराजय होतच असतो आणि पराभवानंतर कसे पुनरागमन करायचे, हे आम्हाला माहीत आहे. आजच्या लढतीत बचावपटूंचा खेळ उल्लेखनीय झाला,’’ असे भारतीय कर्णधार राणी रामपालने सांगितले. भारताला रविवारी बलाढय़ इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे.