नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा धुव्वा उडवून टीम इंडियाने दणक्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडविरोधात भारताचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होईल. अंतिम सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावार खेळवला जाईल असं आतापर्यंत सांगितलं जात होतं. नियोजित कार्यक्रमानुसार अंतिम सामना लॉर्ड्सवर होणार होता, पण आता यात बदल करण्यात आला आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आता लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टन येथे खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १८ ते २२ जून या कालाधीत होणाऱ्या या सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. याबाबत सोमवारी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अंतिम सामना साउथम्प्टन येथील रोज बाउल मैदानात होणार असल्याचं स्पष्ट केलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड्सऐवजी साउथम्प्टनमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल असं स्पष्ट केलं. शिवाय हा सामना पाहण्यासाठी स्वतः जाण्याबाबत देखील नियोजन करत असल्याचं गांगुलीने सांगितलं.


दरम्यान, अंतिम सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना जिंकणारा संघ पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा मानकरी ठरेल. भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडचा ३-१ असा धुव्वा उडवून अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश केला आहे, त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या टीम इंडियाचा पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशीप आपल्या नावे करण्याचा निर्धार असणार आहे.