• भारताविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज
  • आजपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात

बलाढय़ संघाला घरच्या मैदानात नमवत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानासह भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेत मर्दुमकी गाजवण्याच्या आविर्भावात दाखल झाला खरा, पण फक्त दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांचा लौकिक साऱ्यांना कळून चुकला. तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने ०-२ अशी गमावली आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात लाज राखण्याचेच आव्हान भारताच्या संघापुढे असेल. दुसरीकडे यजमान दक्षिण आफ्रिकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली असून ते निर्भेळ यश संपादन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिला कसोटा मालिकेतील पहिला पराभव आहे. २०१४ साली भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते, पण तेव्हा महेंद्रसिंग धोनी हा संघाचा कर्णधार होता. भारताने ही मालिका गमावली असली तरी त्यांच्या क्रमवारीतील अव्वल स्थानाला धक्का लागणार नाही. पण हा मानहानिकारक पराभव त्यांच्या जिव्हारी नक्कीच लागला असेल. दोन्ही सामन्यांसाठी केलेल्या संघनिवडीवर कडाडून टीका होत आहे. या सामन्यात काही बदल अपेक्षित आहेत. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्याऐवजी रोहित शर्माला संधी दिली होती आणि तो सपशेल अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर या लढतीत भुवनेश्वर कुमारलाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या दौऱ्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी पाहायला मिळाली आहे. पण गोलंदाजांनी मात्र भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम चोख बजावले आहे.

व्हर्नन फिलँडर आणि कॅगिसो रबाडा यांनी आतापर्यंत मालिकेत भेदक मारा केला आहे, त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज लुंगी गिडीने आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले आहे. खेळपट्टी आणि गोलंदाजी कशीही असली तरी दक्षिण आफ्रिकेकडून ए बी डी’व्हिलियर्सने आतापर्यंत सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर सलामीवीर डील एल्गर व एडीन मार्कराम यांनीही चांगल्या धावा केल्या आहेत. पण अन्य फलंदाजांना मात्र अजूनही सूर सापडलेला दिसत नाही.

या मैदानाचा आतापर्यंतच्या इतिहास पाहिला तर तो भारताच्या बाजूने राहिलेला आहे. आतापर्यंत १९९२ ते २०१३ या कालावधीमध्ये वॉण्डरस स्टेडियमवर चार कसोटी सामने खेळवले गेले, पण या चार सामन्यांपैकी एकाही लढतीत भारताला पराभव पत्करावा लागलेला नाही. पण या आकडेवारीवर किती विसंबून राहायचे, हे भारतीय संघानेच ठरवायला हवे.

पराभवाचा आढावा प्रशासकीय समिती घेणार

दक्षिण आफ्रिकेत संघाच्या पराभवाचा आढावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रशासकीय समिती घेणार आहे. भारताला सेंच्युरियन आणि केपटाऊन या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

‘‘संघाच्या व्यवस्थापकांकडून आम्हाला कामगिरीचा अहवाल येणार आहे, त्यानंतर आम्ही पराभवाचा आढावा घेणार आहोत. सध्याच्या घडीला खेळाडू आणि अधिकारीही दक्षिण आफ्रिकेत आहेत, त्यामुळे सध्या हा आढावा घेतला जाणार नाही,’’ असे प्रशासकीय समिती सदस्यांनी सांगितले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल.

  • दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डील एल्गर, एडीन मार्कराम, हशिम अमला, टेंबा बव्हुमा, थीयूनिस डी ब्रूयने, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केशव महाराज, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, व्हर्नन फिलॅण्डर, कॅगिसो रबाडा, अ‍ॅण्डीले फेहलुकवायो, लुंगी गिडी, डय़ुआनी ऑलिव्हर.
  • सामन्याची वेळ : दु. १.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.