श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील या शकतासह विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने कसोटीत १८ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ शतके झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात षटकाराच्या मदतीनं विराटने शतक पूर्ण केले. या सामन्यात विराटने ११९ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं नाबाद १०४ धावांची खेळी कली.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक वन-डे शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला होता. रिकी पाँटिंगचा ३० शतकांचा विक्रम कोहलीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मोडला होता. विराटने आपल्या २०० व्या आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला होता. वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहलीच्या पुढे आता भारताचा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारलेल्या सचिनच्या नावावर वन-डे सामन्यात ४९ शतकं जमा आहेत. याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने ५१ शतकं केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकं जमा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक (५१), राहुल द्रविड (३६), सुनील गावसकर (३४), सेहवाग (२३), मोहम्मद अझरुद्दीन (२२) शतके झळकावली असून कोहलीनं कसोटीतील हे १८ वे शतक आहे.