रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय नोंदवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रोहित शर्माने स्वत:चा विश्वविक्रम मोडित काढत तिसरे द्विशतक झळकावून क्रिकेटच्या मैदानातील एक नवे शिखर गाठले. या सामन्यात रोहितसह भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले.

* मोहालीच्या मैदानातील भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला १४१ धावांनी पराभूत केले. यापूर्वी १० मार्च २००२ मध्ये भारताने झिम्बाब्वेला ६४ धावांनी पराभूत केले होते.

* मोहालीच्या मैदानात भारतीय संघाने क्रिकेट जगतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. यापूर्वी १५ डिसेंबर २०० मध्ये राजकोटच्या मैदानात भारताने ४१४ तर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये कोलकाताच्या ईडन्सगार्डनवर ४०४ धावांचा डोंगर उभारला होता.

* श्रीलंकेविरुद्ध ४ बाद ३९२ धावा ही भारतीय संघाने मोहालीच्या मैदानात उभारलेली सर्वोच्च धावसंख्य आहे. २०११ च्या विश्वचषकात मोहालीच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात ३५१ धावा केल्या होत्या. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विक्रम मोडीत काढला.

* भारतीय संघाने तब्बल १०० वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम केला. क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने (९६), दक्षिण आफ्रिकेने (७९), पाकिस्तानने (६९) आणि श्रीलंकेने (६६) वेळा ३०० धावांचा पल्ला गाठला आहे.

* रोहित शर्माने कर्णधार म्हणून साकारलेली द्विशतकी खेळी ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी खेळी आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने कर्णधार असताना २१९ धावांची खेळी केली होती. कर्णधाराची धुरा सांभाळताना सर्वोच्च खेळी करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला. याशिवाय तीनवेळा द्विशतक करण्याचा विश्वविक्रमही त्याने आपल्या नावे केला.

* याशिवाय रोहित शर्माने पाचवेळा दीडशे धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम करत सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाशी बरोबरी केली.

* एकाच हंगामात ६ शतकांची नोद करत रोहित शर्माने विराट कोहलीशी बरोबरी साधली. यापूर्वी सचिन तेंडूलकरने १९९८ मध्ये ९ आणि १९९६ मध्ये ६ शतके ठोकली होती. माजी कर्णधार सौरव गांगुलीने २००७ मध्ये ७ शतके झळकावली होती.

* याशिवाय कॅलेंडर इयरमध्ये चारवेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब पटकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

* शिखर-रोहित यांनी श्रीलंकेविरुद्ध ११५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह या दोघांनी सचिन आणि सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. सलामीला सर्वाधिक २१ वेळा शतकी भागीदारी करण्याचा पराक्रम सौरव-सचिन यांच्या नावे आहे.

* रोहित शर्मा (२०८), शिखर धवन (६८) आणि श्रेयस अय्यर (८८) या आघाडीच्या तीन फलंदाजांनी मिळून ३६४ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीच्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. जोहान्सबर्गमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हाशिम आमला (१५३), रिली रॉसवो (१२८) आणि एबी डिव्हिलियर्स (१४९) धावांची खेळी केली होती.