श्रीलंकेविरुद्धच्या दुसरा एकदिवसीय सामना भारताने तीन गडी राखून जिंकला असला तरी भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडणारा श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजय हाच भाव खाऊन गेला. भारताच्या सहा फलंदाजांना त्याने बाद केले. विशेष म्हणजे भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा धनंजय सामन्याच्या २४ तासांपूर्वीच विवाहबंधनात अडकला होता. त्याने ५४ धावा देत सहा गडी बाद केले आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ३ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २३६ धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला ४७ षटकांमध्ये २३१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी शतकी भागिदारी केली. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर धवनही माघारी परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या फलंदाजांनी साफ निराशा केली. श्रीलंकेचा फिरकीपटू धनंजय याने सहा गडी बाद केले. महेंद्रसिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमारने भारताचा डाव सावरला. एवढेच नाही या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. महेंद्रसिंह धोनी नाबाद ४५ तर भुवनेश्वर कुमारने नाबाद ५३ धावांची खेळी करत विजय खेचून आणला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. भुवनेश्वरने जिगरबाज खेळी करून सामना जिंकून दिला असला तरी भारताचे सहा गडी बाद करणारा श्रीलंकेचा धनंजय सामनावीराचा मानकरी ठरला. त्याची ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे.

[jwplayer fP09Fw8O-1o30kmL6]