पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वींस पार्क ओवल मैदानावरील भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरच्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळही सुरु होऊ शकला नाही. चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली असली तरी मैदानातील ओलाव्यामुळे सामना होऊ शकणार नसल्याचे पंचानी घोषित केले. भारत आणि वेस्ट इंडिज चार कसोटीच्या मालिकेत भारताने पहिल्या तीन सामन्यामधील दोन कसोटी सामने जिंकत मालिका यापूर्वीच खिशात घातली आहे. शेवटच्या सामन्यात आता केवळ एक दिवसाचा खेळ बाकी असून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २ बाद ६२ धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी पावसाच्या आगमनानंतर खेळ थांबविण्यात आला होता. त्यानंतर पावसाने दोन दिवस खेळाडूंना मैदानात उतरण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे अखेरचा कसोटी सामना आता अनिर्णित निकालाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात अमरिकेत दोन टी २० सामने रंगणार आहेत. अमरिकेतील फोर्ट लौडरडेल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्कमध्ये २७ आणि २८ ऑगस्टला हे दोन सामने खेळविण्यात येतील. त्यामुळे भारत-वेस्ट इंडिज यांच्यामधील निकाली सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना आता टी-२० सामन्याची प्रतिक्षा करावी लागेल.