आजपासून सुरू होणाऱ्या भारत-विंडीज पहिल्या कसोटीत मुंबईकर पृथ्वी शॉ याला पदार्पणाची संधी

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

राजकोट : परदेशातील मानहानीकारक पराभवानंतर आता भारतीय संघासमोर मायदेशात अननुभवी वेस्ट इंडिजशी सामना करायचा आहे. या मालिकेनंतर मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे खडतर आव्हान समोर असणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सावरण्याचे आणि योग्य सांघिक समन्वय साधण्याचे लक्ष्य असेल. मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याला राजकोट कसोटीत पदार्पणाची संधी मिळणार आहे.

गेल्या नऊ महिन्यांत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यांवर कसोटी मालिका गमावल्या आहेत. मात्र तरीही आयसीसी कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान टिकवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्वपूर्ण कामगिरी करून आत्मविश्वास उंचावण्याचे आव्हान विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर असेल. कारण नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात भारताला ऑस्ट्रेलियाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जायचे आहे.

वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याची धार जशी बोथट झाली आहे, तसाच त्यांच्या संघाची क्रमवारीत घसरण होत आहे. सध्या आठव्या स्थानावर असलेला हा संघ आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. मात्र २००२ नंतर गेली १६ वर्षे वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, हे वास्तव आहे.

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघातील वारंवार होणाऱ्या बदलांवर बरीच टीका झाली होती. सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन या सलामीवीरांनी आपले स्थान गमावले. इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी न मिळालेल्या करुण नायरलाही वेस्ट इंडिजविरुद्ध डावलण्यात आले. त्यावरून निवड समितीला लक्ष्य केले जात आहे. भारतीय संघ हा पूर्ण ताकदीनिशी उतरत नसला तरी वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवण्यासाठी हा सक्षम आहे.

लोकेश-पृथ्वी सलामीला उतरणार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर म्हणून लोकेश राहुलच्या साथीने मुंबईच्या पृथ्वी शॉ याला पदार्पणाची संधी मिळणार आहे. सलामीचा हा नवा पर्याय यशस्वी ठरल्यास आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्यांच्यावरच विश्वास प्रकट करण्यात येईल. भारतीय संघाने बुधवारी सराव सत्राला प्रारंभ करण्याआधी प्रथमच अंतिम १२ खेळाडूंची नावे घोषित केली. पृथ्वीला इंग्लंड दौऱ्यावर काही सामन्यांनंतर बोलावण्यात आले होते. मात्र पदार्पणाची संधी त्याला मिळू शकली नव्हती. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांक अगरवालपेक्षा पृथ्वीला अधिक पसंती देण्यात आली आहे.

तिहेरी फिरकी माऱ्यावर भारताची भिस्त

रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अशा तिहेरी फिरकी गोलंदाजीच्या माऱ्यावर भारताची भिस्त असणार आहे. याशिवाय उमेश यादव आणि मोहम्मद शमी वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. त्यामुळे शार्दूल ठाकूर हा १२वा खेळाडू असेल. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर इशांत शर्मा दुखापतीतून सावरत आहे. हार्दिक पंडय़ासुद्धा दुखापतग्रस्त असल्यामुळे जडेजावर फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ा सांभाळाव्या लागणार आहेत. आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत यशस्वी पुनरागमन करणाऱ्या जडेजाला घरच्या मैदानावर उत्तम कामगिरी करण्याची संधी असेल. ओव्हल मैदानावर पदार्पणात शतकी खेळी साकारणारा ऋषभ पंतमुळे भारतीय फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भारतीय संघात पाच विशेषज्ञ गोलंदाजांचा समावेश करण्यात आल्यामुळे ओव्हलवर ५६ धावांची झुंजार खेळी साकारणाऱ्या हनुमा विहारीला वगळण्यात आले आहे.

१९९४

१९९४ मध्ये मोहालीत वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या आठ कसोटींत त्यांना विजय मिळवता आलेला नाही.

सचिन तेंडुलकरनंतर (१६ व्या वर्षी) वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कसोटी फलंदाज म्हणून पदार्पण करणारा पृथ्वी शॉ हा भारताचा दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरणार आहे.

३०-४

या दशकात भारताने घरच्या मैदानावर निर्विवादपणे वर्चस्व गाजवले आहे. त्यांनी ३० कसोटी जिंकल्या आहेत, तर अवघ्या चार कसोटींत पराभव पत्करला आहे.

१९१

चेतेश्वर पुजाराला कसोटी कारकीर्दीतील ५,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १९१ धावांची आवश्यकता आहे, तर लोकेश राहुलला २,००० धावा पूर्ण करण्यासाठी १८९ धावांची गरज आहे.

विराटचे मराठी बोल माझ्यासाठी आश्वासक -पृथ्वी

राजकोट : कर्णधार विराट कोहलीचे मराठी बोल माझ्यासाठी आश्वासक ठरले, अशी प्रतिक्रिया पृथ्वी शॉ याने व्यक्त केली आहे. १८ वर्षीय पृथ्वीकडे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सलामीवीराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

‘‘विराट मैदानावर किती आव्हानात्मक असतो, ते सर्वानाच माहीत आहे. मात्र मैदानाबाहेर तो अतिशय विनोदी स्वभावाचा आहे. थोडय़ा वेळापूर्वी माझे त्याच्याशी बोलणे झाले. त्याने काही विनोद मला सांगितले. याचप्रमाणे मराठीत बोलायचा माझ्याशी प्रयत्न केला, ते अत्यंत गमतीशीर होते,’’ असे पृथ्वीने सांगितले.

कसोटीमधील फलंदाजीची आघाडीची फळी ही एकमेव चिंता भारताला भेडसावत आहे. पृथ्वी शॉ याच्यासारख्या युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची योग्य संधी दिली जाईल. पृथ्वीकडून आम्हाला मोठय़ा अपेक्षा आहेत.

– विराट कोहली, भारताचा कर्णधार

पाच खेळाडूंना भारतात कसोटीचा अनुभव

कॅरेबियन संघात गुणवत्ता असली, तरी अनुभवाची कमतरता आहे. वेस्ट इंडिजच्या १५ खेळाडूंपैकी फक्त केमार रोच, क्रेग ब्रेथवेट, कायरेन पॉवेल, देवेंद्र बिशू व श्ॉनॉन गॅब्रिएल हे पाच जण भारतात कसोटी सामना खेळले आहेत. महत्त्वाचा वेगवान गोलंदाज रोचची उणीव त्यांना तीव्रतेने भासणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ नोव्हेंबर २०१३ नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहे. त्या वेळी सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी मालिका त्यांच्याविरुद्ध झाली होती.

लक्षणीय कामगिरीचा लॉ यांना विश्वास

प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडिज संघाने काही लक्षणीय कामगिरी केली आहे. लॉ यांचा कार्यकाळ संपत आला असून, भारताविरुद्धच्या मालिकेत संघाकडून दमदार कामगिरी करून घेण्याचा त्यांचा निर्धार आहे. याशिवाय बडोद्यात दोनदिवसीय सराव सामन्याआधी दुबईत विशेष सरावसुद्धा या संघाने केला आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल. विंडीजने गेल्या वर्षी लीड्स येथे इंग्लंडला हरवण्याची किमया साधली होती. यात शाय होपने १४७ आणि नाबाद ११८ असे योगदान दिले होते. वेस्ट इंडिज संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली आहे, तर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० असा विजय मिळवला आहे.

संघ

भारत (अंतिम १२) : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शोन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, जॅरमर हॅमिल्टन, शिम्रॉन हिटमायर, शाय होप, शेर्मन लेविस, किमो पॉल, कायरेन पॉवेल, केमार रॉच, जोमेल वॉरिकन.

’ सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.