कांबळीचा आशावाद

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे मातब्बर फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकण्याची उत्तम संधी आहे, असा आशावाद माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने व्यक्त केला आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली हा सातत्याने धावा करीत आहे. याशिवाय मैदानावर तो ११० टक्के आपले योगदान देत आहे, असे कांबळीने सांगितले. सध्या कांबळी तेंडुलकर-मिडलसेक्स ग्लोबल अकादमीसाठी वांद्रे येथील एमआयजी क्लबच्या मैदानावर मुलांना मार्गदर्शन करीत आहे.

चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळलेले स्मिथ आणि वॉर्नर एक वष्रे बंदीची शिक्षा भोगत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन ट्वेन्टी-२०, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यापैकी पहिली कसोटी ६ डिसेंबरपासून अ‍ॅडलेडला सुरू होणार आहे.

पृथ्वी शॉच्या कामगिरीविषयी कांबळी म्हणाला, ‘‘पृथ्वी धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे फटकेबाजी करण्यात तो पटाईत आहे. त्याने आपला असाच नैसर्गिक खेळ खेळत राहावे, असे मला वाटते. फारसा विचार न करता मैदानावर फलंदाजीला उतरल्यानंतर तुझा नैसर्गिक खेळ कर, असा सल्ला मी त्याला दिला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या परदेशी दौऱ्यावर आत्मविश्वासाने फलंदाजी करणे आवश्यक आहे. पृथ्वीही आत्मविश्वासाने खेळी करेल, असे मला वाटते.’’