अवध वॉरियर्सविरुद्धच्या लढतीत दिल्ली स्मॅशर्सला विजय मिळविण्यासाठी खडतर परिश्रम करावे लागणार अशी अपेक्षा आहे. साखळी गटात अवध संघ शेवटच्या स्थानावर आहे. दिल्ली संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
एकेरीत प्रामुख्याने बी.साईप्रणीत व डॅरेन लिऊ यांच्यावर दिल्लीची मदार आहे. साईप्रणीत हा भारताचा भावी आधारस्तंभ मानला जात आहे. लिऊ याच्याकडे अनपेक्षित विजय नोंदविण्याची क्षमता आहे. अवध संघाकडून पुरुषांच्या एकेरीत किदम्बी श्रीकांत याच्यावर मुख्य भिस्त आहे. त्याने थायलंड ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचा सहकारी चोंग वेई फेंग याच्याकडूूनही एकेरीत विजयाची अपेक्षा केली जात आहे.
महिलांमध्ये जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या पी.व्ही.सिंधू हिला आयबीएल स्पर्धेत अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही. अवध संघाची कर्णधार असलेल्या या खेळाडूस अरुंधती पानतावणेविरुद्ध झुंजावे लागणार आहे. चापल्यता विरुद्ध अनुभव असाच हा सामना होणार आहे.
मिश्रदुहेरीत दिल्लीची ज्वाला गट्टा सहभागी होणार की नाही हीच उत्सुकता आहे. पायाच्या दुखापतीमधून ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही. त्यामुळेच मुंबईविरुद्धच्या लढतीत ती सहभागी झाली नव्हती.
व्ही.दिजू याच्या साथीत प्राजक्ता सावंत हिलाच संधी मिळण्याची शक्यता आहे. अवध संघाकडून नंदगोपाळ व के.मनीषा यांना संधी दिली जाईल असा अंदाज आहे.
पुरुषांच्या दुहेरीत अवध संघाची भिस्त मथायस बोई व मार्किस किडो यांच्यावर आहे. त्यांना कोकिन कित व बान वोहोंग यांच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे.

व्यावसायिक संयोजन व समन्वयाचा अभाव!
आयबीएल स्पर्धेचे सामने केवळ एक दिवसावर आले असताना शिवछत्रपती क्रीडानगरीत सामन्याच्या आयोजनाची तयारी सुरूच होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता व्यासपीठ उभारण्यास बुधवारी सकाळी सुरुवात झाली. खेळाडूंचा एकीकडे सराव सुरू असतानाच त्यांची ही कामे सुरू झाल्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. या लढतींकरिता मध्यभागी असलेल्या कोर्ट्सचा उपयोग सामन्यांकरिता केला जाणार होता. त्यानुसार प्रेक्षकांची व्यवस्था केली जाणार होती. मात्र ऐनवेळी पूर्वेकडील दोन कोर्ट्सचा उपयोग करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. त्यामुळे अनेक प्रेक्षकांवर लांबूनच हे सामने पाहण्याची वेळ येणार आहे.
या सामन्यांकरिता तिकीट विक्री फक्त शिवछत्रपती क्रीडानगरीतच होती. ऑनलाईनद्वारे तिकिटांचे आरक्षण करणाऱ्यांनाच बुधवारी तिकिटे देण्यात येत होती. त्यामुळे रोख पैसे देऊन तिकिटे विकत घेण्यासाठी आलेल्या बॅडमिंटन चाहत्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. हे संकुल शहरापासून साधारणपणे १५ ते १८ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सामन्यांच्या तिकीटविक्रीकरिता शहरात केंद्रे ठेवायला पाहिजे होती अशी मागणी या चाहत्यांनी केली.  
वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स२ आणि ईएसपीएन