मुंबईकर प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादाला जागत सायनाने इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेत विजयी हॅटट्रिक नोंदवली. सायनाच्या या कामगिरीच्या जोरावर हैदराबाद हॉटशॉट्सने पुणे पिस्टन्सवर ४-१ असा मोठय़ा फरकाने विजय मिळवला. मात्र हा विजय सायनाला समाधान देऊ शकला नाही.
 सायनाविरोधात गेलेले पंचांचे काही निर्णय त्याला कारणीभूत ठरले. ‘‘दुसऱ्या गेममध्ये रेषेसंदर्भातील अनेक गुण माझ्याविरोधात गेले. चुका घडू शकतात. पण त्या सर्व माझ्याविरुद्ध झाल्या. एखाद-दुसरा निर्णय विरोधात गेला असता तर समजू शकले असते, पण पाच-सहा वेळा मला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. मुख्य पंचांनीही निर्णय बदलला नाही. त्यानंतर चांगला खेळ करत आम्ही पुनरागमन केले. सामन्यात झालेल्या नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून वाटचाल करेन,’’ असे सायनाने सांगितले.
‘‘शेंक अव्वल दर्जाची खेळाडू आहे. तिच्याविरुद्ध खेळताना नेहमीच कसोटी असते. दमछाक करणाऱ्या सामन्यासाठी मी तयार होते. पहिला गेम गमावल्यानंतरही सामना जिंकला, याचे समाधान आहे,’’ असे सायना म्हणाली.