करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्याला पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंनी पाठिंबाही दर्शवला. पण याच दरम्यान, पाकचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने मात्र एक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

गांगुली ओरडून ओरडून सांगत होता, पण कैफने ऐकलंच नाही… वाचा ‘तो’ किस्सा

इंझमामने यू-ट्युबवर समालोचक रमीझ राजा याच्याशी लाइव्ह चॅटद्वारे संवाद साधला. त्यावेळी इंझमाम म्हणाला की भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या खेळाडूंमध्ये एक फरक आहे. पाकिस्तानचे खेळाडू हे देशासाठी खेळायचे, पण भारताचे खेळाडू मात्र स्वत:साठी खेळायचे. “आम्ही जेव्हा भारता विरूद्ध क्रिकेट खेळायचो, तेव्हा त्यांची फलंदाजी ही आमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होती. पण पाकिस्तानचे फलंदाज फलंदाजी करताना ज्या ३०-४० धावा करायचे, त्या धावा संघासाठी करायचे. याउलट भारताचे खेळाडू मात्र स्वत:च्या विक्रमांसाठी शतक ठोकायच्या मागे लागायचे. ते देशासाठी नव्हे, तर स्वत:साठी खेळायचे”, असा इंझमामने दावा केला.

“क्रिकेट नाही, किमान कोचिंग तरी करू द्या”

इंझमामने १९९१ ते २००७ या कालावधीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. या काळात पाकिस्तानने भारतावर बराच काळ वर्चस्व गाजवले. इंझमामने १२० कसोटी, ३७८ वन डे आणि १ टी २० सामना खेळला. याशिवाय, पाकिस्तान आणि भारत यांच्यात एकूण ५९ कसोटी, १३२ वन डे आणि ८ टी २० सामने खेळले गेले. त्यात भारताने ९ कसोटी, ५५ वन डे आणि ६ टी २० सामने जिंकले, तर पाकिस्तानने अनुक्रमे १२, ७३ आणि १ सामना जिंकला.