आंतरराष्ट्रीय स्तरावर परतण्यासाठी नव्याने निवडणूका घेण्याची अट अद्याप पूर्ण न केल्याने भारतीय बॉक्सिंग महासंघावरील (आयबीएफ) बंदी कायम राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयबीएफवर बंदी घातली होती. आयबीएफने योग्य पद्धतीने निवडणूका न घेता, तत्कालिन अध्यक्ष अभयसिंग चौटाला यांनाच अध्यक्षपदाच्या खूर्चीवर पुन्हा विराजमान केले होते. भारतीय क्रीडा मंत्रालयानेही या निवडीला मान्यता दिली नव्हती. एआयबीएने नव्याने निवडणूका घेण्यासाठी बुधवापर्यंतची अंतिम मुदत दिली होती. पण आयबीएलला पुनर्निवडणूक घेण्यात अपयश आले आहे.
‘‘भारतातील बॉक्सिंगला चालना देण्यासाठी महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत. पण आयबीएफमध्येच अंतर्गत वाद सुरू असल्यामुळे निवडणूका घेणे शक्य होत नाही, असे समजते,’’ असे एआयबीएचे प्रवक्ते सेबॅस्टियन गिलोट यांनी सांगितले. विजेंदर सिंगने २००८ बीजिंग तर एम. सी. मेरी कोम हिने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यामुळे भारतात बॉक्सिंग हा खेळ लोकप्रिय होऊ लागला आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर आंतरराष्ट्रीय आलिम्पिक समितीने गेल्या वर्षी बंदी घातली होती. आयओसीच्या नव्या आचारसंहितेचे पालन करून संघटनांच्या पदावर असलेल्या भ्रष्टाचारी व्यक्तींना दूर ठेवण्याची अट आयओसीने आयओएसमोर घातली आहे.