भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कॉन्स्टन्टाइन यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

एका चांगल्या सुरुवातीनंतर भारताला या स्पर्धेतील अखेरच्या साखळी फेरीत बहारिनकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ९०व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल स्वीकारत १-० असा पराभव झाल्याने भारताला मायदेशी परतावे लागले. ‘‘या पराभवानंतर मी पायऊतार होत आहे. चार वर्षांपूर्वी मी भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा भारताला एएफसी आशिया चषकासाठी पात्र ठरवणे, हेच उद्दिष्ट मी ठेवले होते. ते मी करून दाखवले. संघातील सर्व खेळाडूंचा मला त्याबद्दल अभिमान वाटत आहे. माझी वेळ आता संपत आली आहे, असे मला वाटते. मला काही काळ थांबण्यास सांगण्यात आले होते. पण चार वर्षांनंतर आता निघून जाणेच योग्य होईल,’’ असे कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले.

यापूर्वी २००२ ते २००५ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कॉन्स्टन्टाइन यांचा हा प्रशिक्षकपदाचा दुसरा कार्यकाळ होता. कर्णधार सुनील छेत्री आणि संघातील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे कॉन्स्टन्टाइन यांची उचलबांगडी होणार, अशी चर्चा होती. ‘‘अखेरच्या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी जीव ओतून खेळ केला. पण अखेर अपयशच भारताच्या पदरी आले,’’ असेही त्यांनी सांगितले.

कॉन्स्टन्टाइन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत १७३व्या क्रमांकावरून ९६व्या स्थानी झेप घेतली होती. ते म्हणाले, ‘‘भारत सोडताना मला अतीव दु:ख होत असून खेळाडू आणि सहाय्यक प्रशिक्षकांनी खूपच पाठिंबा दिला मी आता कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे.’’