भारतीय हॉकी संघाने २०१८ या वर्षाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौरंगी मालिकेत भारताने दोन्ही सत्रांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यांमध्ये भारताला बेल्जियमकडून पराभव स्विकारावा लागला असला तरीही भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या झुंजार खेळामुळे भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन सध्या चांगलेच आनंदात आहेत. भारतात परतल्यानंतर मरीन यांनी संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं.

ही मालिका आमच्या सर्व खेळाडूंसाठी एक चांगला अनुभव देणारी ठरली. ८ महिन्यांच्या दुखापतीनंतर श्रीजेशने ज्या झोकात पुनरागमन केलं आहे, ते पाहता आमच्या संघासाठी हा शुभशकून असल्याचं मरीन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. “या मालिकेतून आमच्या संघासाठी काही सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत. याआधी चांगल्या कामगिरीत सातत्य राखणं आमच्यासाठी गरजेचं होतं, आणि या मालिकेत हे आम्ही करुन दाखवलं आहे. बेल्जियमविरुद्ध खेळलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने आम्ही गमावले, मात्र या सामन्यांमध्येही आम्ही त्यांना चांगली लढत दिली. याव्यतिरीक्त मैदानी गोल आणि पेनल्टी कॉर्नरच्या कन्व्हर्जन रेटमध्येही सुधारणा झालेली आहे.” मरीन यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचं तोंड भरुन कौतुक केलं.

याचसोबत तरुण खेळाडूंच्या कामगिरीवरही मरीन यांनी समाधान व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा पदार्पण करणारा गोलकिपर क्रिशन पाठक, मधल्या फळीतले खेळाडू सिमरनजीत सिंह आणि विवेक प्रसाद, आघाडीच्या फळीतला खेळाडू दिलप्रीत सिंह यांनी वातावरणाशी जुळवून घेत चांगला खेळ केला. त्यामुळे यापुढे ही मंडळी कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.