भारताच्या पुरुष संघाने गचीबोवली येथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत बलाढय़ चीनचा ३-२ अशा फरकाने पाडाव केला. किदम्बी श्रीकांत, अजय जयराम आणि एच. एस. प्रणॉय यांच्या एकेरीतील शानदार विजयांमुळे भारताला हे यश मिळाले. महिलांमध्ये मात्र जपानने भारताचा ५-० असा धुव्वा उडवला. भारताचे दोन्ही  संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
पहिल्या एकेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर विराजमान असलेल्या श्रीकांतने चीनच्या होवेई तियानचा २१-११, २१-१७ असा पराभव केला. दुसऱ्या रंगतदार सामन्यात अजय जयरामने झेंगमिंग वांगला २२-२०, १५-२१, २१-१८ असे पराभूत केले. वांग जागतिक क्रमवारीत जयरामपेक्षा पुढे आहे. वांग ११व्या तर जयराम २५व्या स्थानावर आहे. मात्र जयरामने तोलामोलाची लढत देत सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानावरील प्रणॉयने युकी शि याला २१-१४, २१-१० असे सहज हरवले.
उर्वरित दोन दुहेरीच्या सामन्यांमध्ये मात्र भारताची निराशा झाली. जुन्हुई लि आणि झियान क्यू यांनी मनू अत्री आणि सुमित रेड्डी जोडीला २२-२०, २१-११ असे हरवले. तर यिल्व वांग आणि वेन झांग जोडीने जेरी चोप्रा आणि अक्षय देवळकर जोडीला २१-१०, २१-१८ असे पराभूत केले.
महिलांमध्ये नोझोमी ओखुहाराने पी.व्ही.सिंधूवर १८-२१, २१-१२, २१-१२ असा विजय मिळवला. सायाका साटोने पी.सी. तुलसीवर २४-२२, २१-१४ अशी मात केली. युई हाशिमोटोने रुथविका शिवानी गड्डेचा २३-२५, २१-१४, २१-१४ असा पराभव केला.
दुहेरी प्रकारात मिसाकी मात्सुटोमो आणि अयाका ताकाहाशी जोडीने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१२, २१-१८ अशी मात केली. शिझुका मात्स्युओ आणि मामी नाइटो जोडीने सिक्की रेड्डी आणि पी.व्ही.सिंधू जोडीवर १८-२१, २१-११, २१-१६ असा विजय
मिळवला.

भारतीय पुरुष संघाने चीनसारख्या बलाढय़ संघावर मिळवलेला विजय अविस्मरणीय आहे. स्पर्धेतल्या पुढच्या सामन्यांमध्येही भारतीय संघ हा फॉर्म कायम राखेल असा विश्वास आहे.
– पुल्लेला गोपीचंद, राष्ट्रीय प्रशिक्षक