ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ‘बिग बॅश ट्वेन्टी-२० लीग’ची धूम असून या लीगदरम्यान एका सामन्यात भारतीय वंशाच्या सिक्युरिटी गार्डने सीमारेषेबाहेर टिपलेला अफलातून झेल चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॅश लीगचा सामना सुरू असताना सीमारेषेबाहेर एका खुर्चीवर बसून आपली ड्युटी करणाऱया विकास छिकारा नावाच्या भारतीय वंशाच्या तरुणाने अप्रतिम झेल टिपला. विकासने टिपलेला झेल पाहून क्रिकेटपटूंसह उपस्थित प्रेक्षक आवाक झाले. प्रेक्षकांनी तर एकच जल्लोष सुरू केला. जो बर्न्स या फलंदाजाने बाऊन्सर चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने दोरदार फटका लगावला होता. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेला आणि पंचांनी षटकार देखील घोषित केला. पण हा चेंडू सीमारेषेबाहेर खुर्चीवर बसलेल्या विकासने अचून आणि अगदी सहजपणे टिपला. विकासचे झेल टिपण्याचे कौशल्य पाहून प्रेक्षकांनी जल्लोष सुरू केला आणि समालोचकांनीही विकासने टिपलेल्या झेलचे कौतुक केले.

ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे विकासने यावेळी लक्ष वेधून घेतले. सर्वांनी टाळ्या वाजवून विकासला प्रतिसाद दिला. ऑस्ट्रेलियन माध्यमांनीही विकासची मुलाखत घेऊन त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली. विकास म्हणाला की, चेंडू थेट माझ्या चेहऱयाच्या दिशेने आला आणि मी सहज टिपला. चेंडू अगदी अचून माझ्या चेहऱयावर असल्याने मला झेल टिपणे सोपे गेले. मला एक इंच देखील हालचाल करावी लागली नाही. प्रेक्षकांनी आपल्याला दिलेल्या प्रतिसादावरही विकाने आश्चर्य व्यक्त केले. मी काही खास कामगिरी केली आहे, असे मला वाटत नाही. मी चेंडू टिपून तो क्षेत्ररक्षकाला देऊन माझे काम केले, असे प्रांजळ मत विकाने व्यक्त केले.