दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. कसोटी मालिकेत मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव या त्रिकुटाने प्रतिस्पर्धी संघाला खिंडार पाडलं. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने भारतीय गोलंदाजांचं कौतुक केलं आहे.

भारतीय गोलंदाज सध्या जुन्या विंडीज संघातील गोलंदाजांप्रमाणे मारा करत आहेत. त्यांची कामगिरी अविश्वसनीय आहे. “मी वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिकेत त्यांची कामगिरी अनुभवली आहे. बुमराह, शमी, उमेश यादव आणि भुवनेश्वर हे सर्व गोलंदाज सध्या अतिशय योग्य टप्प्यात मारा करतायत. ८० ते ९० च्या काळात विंडीजचे गोलंदाज अशा पद्धतीने मारा करायचे.” मुंबईत एका कार्यक्रमात ब्रायन लारा पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs SA : रांची कसोटीत महेंद्रसिंह धोनी हजर राहणार

२०१८ साली जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने १४२ बळी घेतले आहेत. शनिवारी रांचीच्या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – तिसऱ्या कसोटीआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का, सलामीवीर एडन मार्क्रम संघाबाहेर