पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध होता. रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा शोएब विकेट घेतल्यानंतर मैदानात आपल्या खास पद्धतीने सेलिब्रेशनही करायचा. अनेक फलंदाजांना शोएबच्या गोलंदाजीची भीती वाटायची. शोएबचा सामना करताना अनेक फलंदाजांनी स्वतःला इजाही करुन घेतली आहे. अनेकदा प्रतिस्पर्धी संघातले तळातल्या फळीतले फलंदाज मी गोलंदाजी करत असताना, पाहिजे तर आम्हाला आऊट कर पण मारु नकोस अशी विनंती करायचे असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
अवश्य वाचा – तुमच्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची वाट लागते आहे, मियाँदादने इम्रान खानला फटकारलं
“काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत असताना अनेक फलंदाजांना माझ्या गोलंदाजीचा अंदाज यायचा नाही. अनेकदा माझे चेंडू समोरच्या फलंदाजाला जाऊन लागायचे…मला तेव्हा खूप वाईट वाटायचं, पण मी ते मुद्दाम करत नव्हतो. यानंतर अनेकदा तळातले फलंदाज मला विनंती करायचे की आमची विकेट घे पण मारु नकोस. मुरलीधरन असो किंवा भारतीय संघातले तळातले फलंदाज मला नेहमी विनंती करायचे. घरी बायका-मुलं आहेत त्यांना आवडणार नाही असं अनेकदा मला खेळाडूंनी सांगितलं आहे.” शोएब अख्तर Cric Cast या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
अवश्य वाचा – बाबर आझमला आयपीएलमध्ये खेळण्याची गरज – नासिर हुसैन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर शोएब अख्तर सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. अनेकदा भारतविरोधी वक्तव्यांमुळे शोएब अख्तरला सोशल मीडियावर ट्रोल होताना आपण पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट मालिका सुरु होणं गरजेचं आहे असं मतही शोएबने व्यक्त केलं होतं. मात्र शोएबच्या या प्रस्तावाला भारताच्या आजी-माजी खेळाडूंनी नकार दर्शवला होता.