कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत चांगली सुरुवात केली आहे. विराटचं भारतात परतणं, शमीला झालेली दुखापत आणि पृथ्वी शॉचा खराब फॉर्म यामुळे भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात ४ बदल केले. शॉच्या जागेवर शुबमन गिलला संधी देण्यात आली, शमीची जागा मोहम्मद सिराजने घेतली, साहाला विश्रांती देऊन पंतला संधी देण्यात आली….तर विराटच्या जागेवर रविंद्र जाडेजा संघात आला. भारतीय संघाच्या या निवडीवर अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

माजी खेळाडू गौतम गंभीरने टीम मॅनेजमेंट साहा आणि पंत या दोघांवरही अन्याय करत असल्याचं म्हटलंय. “केवळ एक कसोटी सामना खेळून त्यात खराब कामगिरी झाल्यामुळे साहाला संधी न मिळणं हे दुर्दैवी आहे. विचार करा जर पंत दुसऱ्या कसोटीत चांगला खेळला नाही तर मग काय कराल?? परत साहाला संघात आणणार का?? याच कारणामुळे भारताचा हा संघ स्थिरावलेला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना प्रत्येक खेळाडूला पाठींबा हवा असतो. प्रत्येकात गुणवत्ता आहे म्हणूनच ते इथपर्यंत आलेत.” गंभीर Sports Tak ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

तुम्ही खेळाडूंना पाठींबा देणं हे फक्त शब्दांतून नाही तर कृतीमधून दिसायला हवं. यष्टीरक्षणात भारताइतके बदल कोणीच करत नाही. एका अर्थाने टीम मॅनेजमेंट साहा आणि पंत दोघांवरही अन्याय करत आहे, गंभीरने आपलं स्पष्ट मत मांडलं. दरम्यान रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सत्रात चांगला खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखलं होतं.