भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मिताली राजने ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्त्व केलं. यामध्ये २०१२ (श्रीलंका), २०१४ (बांगलादेश) आणि २०१६ (भारत) या तीन टी-२० विश्वचषकांचा समावेश आहे. मिताली राजच्या नेतृत्त्वात भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात मात्र अयशस्वी ठरला.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.

मिताली राजने भारताकडून ८८ टी-२० सामन्यांचं नेतृत्त्व केलं आहे. टी-२० करिअरमध्ये ३७.५२ च्या सरासरीने तिने २३६४ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर बोलताना मिताली राजने सांगितलं आहे की, “२००६ पासून भारतीय संघाचं नेतृत्त्व केल्यानंतर आता टी-२० चा मी निरोप घेऊ इच्छित आहे. मी आता २०२१ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करत आहे”.

“आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकणं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी माझं सर्वोत्तम योगदान देणार आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानते. तसंच भारतीय टी-२० संघाला दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी शुभेच्छा देते”, असं मिताली राजने सांगितलं आहे.