दक्षिण आफ्रिकेचे उपखंडीय जेतेपद जिंकणे पथ्यावर

दक्षिण आफ्रिकेच्या महिला हॉकी संघाचा उपखंडीय स्पर्धा जिंकण्याचा फायदा भारतीय महिला संघाला झाला आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषक स्पध्रेत खेळण्याची संधी भारतीय हॉकीपटूंना मिळाली आहे. २०१०नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे.

जोहान्सबर्ग येथे जुलै महिन्यात झालेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये (उपांत्य फेरी) अव्वल पाच संघामध्ये स्थान निश्चित करून दक्षिण आफ्रिकेने  विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवली होती. मात्र, रविवारी मध्यरात्री आफ्रिकेने उपखंडीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि  त्यांचा विश्वचषक स्पध्रेतील प्रवेश निश्चित झाला. आफ्रिकेने घाना संघावर ४-० अशी मात करून उपखंडीय जेतेपद पटकावल्याने जागतिक लीगमधील त्यांचे स्थान रिक्त झाले आणि जागतिक क्रमवारीत भारत १२व्या स्थानावर असलेल्या भारताला संधी मिळाली. जागतिक हॉकी लीगमध्ये (उपांत्य फेरी) भारत आठव्या स्थानावर होता.

याआधी यजमान म्हणून इंग्लंडचा विश्वचषक स्पध्रेसाठी थेट प्रवेश निश्चित झाला होता आणि त्याचा फायदा सहाव्या स्थानावर असलेल्या जपानला झाला होता. भारताला विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील विजेतेपद अनिवार्य होते.

‘विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळणे ही भारतीय महिलांसाठी मोठी संधी आहे. यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी निश्चितच वाढली आहे आणि अजून मेहनत घेण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे. प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा अनुभवाचा खेळाडूंना फायदा नक्की मिळेल,’ असा विश्वास  पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने व्यक्त केला.

०७ : भारतीय महिला संघ सातव्यांदा विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. २०१० मध्ये त्यांना अखेरचा विश्वचषक स्पध्रेत सहभाग घेतला होता आणि त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

०४ : भारतीय महिला संघाने आत्तापर्यंत सहावेळा विश्वचषक स्पध्रेत सहभाग घेतला असून १९७४मधील चौथे स्थान ही त्यांनी सर्वोत्तम कामगिरी आहे.

भारतीय महिला संघाची विजयी घोडदौड सुरूच

काकामीगाहारा (जपान) : चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडवत भारताने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत चीन संघाचा ४-१ असा सहज पराभव केला. या स्पर्धेत त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. भारताकडून गुरजीत कौर (१९ मि.), नवज्योत कौर (३२ मि.), नेहा गोयल (४९ मि.) व कर्णधार राणी रामपाल (५८ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताने पहिल्या सामन्यात सिंगापूरचा १०-० असा धुव्वा उडवला होता. भारताची मंगळवारी मलेशियाशी गाठ पडणार आहे.

१५० : गोलरक्षक सविताने १५०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा विक्रम नावावर केला.