भारताला नेशन्स चषक सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी आठव्या फेरीत युरोपविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. मात्र तत्पूवी, भारताने या स्पर्धेतील पहिला विजय शेष विश्ववर मिळवला.

युरोपविरुद्धच्या लढतीत भारताकडून विदित गुजरातीने युरोपच्या लेवॉन अरोनियानला नमवत पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र भारताच्या पी. हरिकृष्णला जॅन-क्रिस्टोर्फ डय़ूडाने नमवत युरोपला बरोबरी साधून दिली. माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद आणि मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्ह यांच्यातील डाव ६० चालींमध्ये बरोबरीत संपला. महिलांच्या लढतीत जागतिक जलद स्पर्धेतील विजेत्या कोनेरू हम्पीनेही अ‍ॅना मुझिचूकविरुद्ध बरोबरी साधली. या निकालांमुळे भारत आणि युरोप यांच्यातील लढत बरोबरीत संपली.

तत्पूर्वी, सातव्या फेरीत आनंद आणि हरिकृष्ण यांनी त्यांच्या लढती जिंकल्याने शेष विश्व संघावर भारताला मात करता आली. आनंदने तैमूर राद्याबॉवचा ३७ चालींत पराभव केला. गुरुवारीदेखील आनंदने रशियाच्या इयान नेपोमनियाशचीला १७ चालींत नमवत पहिल्या विजयाची नोंद केली होती. हरिकृष्णला पहिल्या पाच लढतींत चार वेळा बरोबरी आणि एक वेळा पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्याने जॉर्जी कोरीचा पराभव करत स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू विदित गुजरातीला स्पर्धेतील चौथा पराभव अलिरेझा फिरुझाकडून स्वीकारावा लागला. महिलांमध्ये डी. हरिका आणि मारिया मुझिचूक यांच्यातील डाव बरोबरीत संपला.