अखेर प्रतीक्षा संपणार आहे. करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ स्थगित झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुधवारपासून सुरू होत आहे. जैवसुरक्षित स्टेडियमवर इंग्लंड संघ पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे.

बेन स्टोक्स आणि जेसन होल्डर हे अनुक्रमे इंग्लंड आणि विंडीजचे कर्णधार करोनाचे आव्हान पेलत संघाला सज्ज करीत आहेत. बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना होणाऱ्या या सामन्याचा आनंद क्रिकेटरसिकांना मात्र टेलिव्हिजनवरच लुटता येणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) करोना कालखंडासाठीचे विशेष नियम राबवणार आहेत. गोलंदाजांना चेंडूला लाळेचा वापर करता येणार नाही.

वातावरण निर्मितीसाठी प्रेक्षक आणि संगीताचे ध्वनी

प्रेक्षकांविना होणाऱ्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वातावरण निर्मितीसाठी विशेष प्रयोग केले जाणार आहेत. करोनापूर्व काळातील सामन्याप्रमाणेच भासणारे प्रेक्षक आणि संगीताचे ध्वनी यावेळी स्टेडियमवर क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी दिमतीला असतील. रिकाम्या स्टेडियमवर प्रेक्षकांच्या वातावरण निर्मितीसाठी फुटबॉलमध्येही अशा प्रकारचे प्रयोग करण्यात आले होते. काही फुटबॉल लीगच्या सामन्यांना प्रेक्षकांचे फलकही स्टेडियमवर बसवण्यात आले होते.

*  सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.