रोनक पंडित, आंतरराष्ट्रीय नेमबाज

नेमबाजी या खेळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडू सातत्यपूर्ण यश मिळवत आहेत. विशेषत: अनेक युवा खेळाडू विश्वचषक स्पर्धेत सोनेरी कामगिरी करू लागले आहेत. त्या यशावर समाधान न मानता त्यांनी ऑलिम्पिक पदकाचे ध्येय डोळय़ांसमोर ठेवत मेहनत करावी, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नेमबाज रोनक पंडितने दिला आहे.

मेक्सिकोत सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने घवघवीत यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धाप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरही खेळाडूंची कामगिरी जागतिक दर्जाइतकी होत आहे. खेळाडूंच्या कामगिरीबाबत व आगामी विविध स्पर्धाबाबत रोनकशी केलेली बातचित-

* युवा खेळाडूंच्या कामगिरीबाबत काय सांगता येईल?

खरोखरच अभिमानास्पद अशी कामगिरी भारतीय खेळाडूंकडून होत आहे. विशेषत: जागतिक स्पर्धेत पदार्पण करणारे अखिल शेरॉन, मनू भाकेर, मेहुली घोष यांच्यासारख्या खेळाडूंनी कोणतेही मानसिक दडपण न घेता सोनेरी मोहोर उमटवल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. राजवर्धनसिंग राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग यांच्यासारख्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंची परंपरा पुढे नेण्याची क्षमता आपल्याकडे आहे, हे या खेळाडूंनी दाखवून दिले आहे. मात्र या खेळाडूंना अजून भरपूर कारकीर्द घडवायची आहे. ही त्याची सुरुवात असून पदकाचा आनंद अल्पकाळ घेत भावी स्पर्धाचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न कसे साकारता येईल, यासाठी कसा सराव केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला पाहिजे.

* सप्टेंबरमध्ये ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे. त्यामध्ये आपल्याला किती संधी आहे?

सप्टेंबरमध्ये विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धा दक्षिण कोरियात होणार आहे. तेथे पिस्तूल, रायफलसहित सर्वच क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक क्रीडाप्रकारातील किमान तीन-चार खेळाडूंना ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्याची संधी आहे, हे लक्षात घेतले तर भारताच्या कमीतकमी १५ ते २० खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवता येईल. अर्थात ही संधी साधण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत केली पाहिजे. मागील ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांच्या गुणांचा अभ्यास करीत सरावाचे नियोजन केले पाहिजे.

* परदेशी प्रशिक्षकांची आवश्यकता आहे काय?

साधारणपणे १९९२ पूर्वी आपल्या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांची गरज होती. मात्र गेल्या १२-१५ वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी एवढी उंचावली आहे की आपल्याला परदेशी प्रशिक्षकांची गरज नाही. आपल्याकडील अनुभवी खेळाडूच आता प्रशिक्षकाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. जागतिक स्पर्धेइतकी कामगिरी आपले खेळाडू सरावादरम्यान करीत आहेत. फक्त ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी कणखर मानसिक तंदुरुस्ती वाढवण्यावर आपल्या खेळाडूंनी व त्यांच्या प्रशिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. परदेशी प्रशिक्षक हे फक्त व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत शिकवत असतात. त्यांचा आपल्या खेळाडूंबरोबर योग्य रीतीने सुसंवाद होत नाही. भारतीय प्रशिक्षकाचे प्रत्येक खेळाडूबरोबर भावनिक संबंध असतात व त्यांच्यात योग्य समन्वय असतो.

* राठोड यांच्याकडे क्रीडा मंत्रालय आल्यानंतर काय सुधारणा झाली आहे?

आम्हा नेमबाजांच्या सुदैवाने राठोड यांच्यासारख्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या खेळाडूकडे केंद्रीय क्रीडा मंत्रालय सोपवण्यात आल्यानंतर खूप सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. ऑलिम्पिक पदक व्यासपीठ (टॉप) योजनेंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना दरमहा थेट खात्यात शिष्यवृत्ती मिळू लागल्यामुळे खेळाडूंची आर्थिक अडचण दूर झाली आहे. परदेशातील स्पर्धेमधील सहभाग, फिजिओ, नेमबाजीची साधने आदी बारीकसारीक गोष्टींबाबत राठोड यांचा भरपूर अनुभव असल्याचा आम्हाला फायदा होत आहे. त्याचप्रमाणे ‘खेलो इंडिया’ या उपक्रमामुळे देशात क्रीडा क्षेत्राविषयी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती निर्माण होण्याच्या दिशेने ते एक पाऊल टाकले गेले आहे.

*  देशात नेमबाजीच्या सुविधा पुरेशा आहेत काय?

गेल्या १२ वर्षांमध्ये नेमबाजीत घडवणाऱ्यांची संख्या दहा पटीने वाढली आहे. केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शेकडो खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र या खेळाडूंना पुरेशा सुविधा आपल्याकडे नाहीत. महाराष्ट्रात जागतिक दर्जाची अकादमी केवळ पुण्यातच आहे व तेथेही योग्य देखभालीच्या अभावी खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने त्याच्या देखभालीसाठी योग्य तरतूद केली तर तेथील सुविधा फक्त खेळाडूंसाठीच उपयोगात आणल्या जातील. त्याचप्रमाणे राज्यात अन्य ठिकाणी नेमबाजीच्या छोटय़ा छोटय़ा अकादमी स्थापन करण्यासाठी लहान प्रमाणात प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता आहे. अशी केंद्रे सुरू झाली तर महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक विजेते घडू शकतील.