तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या काळात ऑनलाइन बुद्धिबळाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. मोठय़ा प्रमाणावर झालेल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धामुळे अनेक जण या खेळाकडे वळले. आता देशातील प्रत्येक शाळेमध्ये बुद्धिबळ हा खेळ पोहोचविण्याचे ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे, असे मत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (एआयसीएफ) नवनियुक्त सरचिटणीस भरत सिंह चौहान यांनी व्यक्त केले.

बऱ्याच वादविवादानंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘एआयसीएफ’च्या निवडणुकीत भरत सिंह चौहान यांच्या पॅनेलने पी. आर. वेंकटरामा राजा पॅनेलचा धुव्वा उडवत १५ पैकी १२ जागा पटकावल्या. सलग तिसऱ्यांदा सरचिटणीसपदी निवडून आलेल्या चौहान यांच्याशी आगामी योजनांविषयी केलेली ही बातचीत –

* वेंकटरामा राजा पॅनेलवर १२-३ अशी मात केलीत. या निवडणुकीसाठी कोणती विशेष रणनीती तयार केली होती?

दोन्ही पॅनेलमध्ये बऱ्याच महिन्यांपासून वादविवाद सुरू होते. दोन्ही पॅनेलनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताच्या दोन वेगवेगळ्या संघांची घोषणा केली होती. त्यामुळेच हे वातावरण तापल्याने या निवडणुकीची रंगत आणखीन वाढली होती. विद्यमान अध्यक्ष वेंकटरामा राजा यांच्यावर मात करणे सोपे नव्हते. पण बुद्धिबळपटू या नात्याने मी विविध संघटना तसेच खेळाडूंसमोर आपल्या कामाची माहिती ठेवली. प्रतिस्पर्धी गटाने पाच राज्य असोसिएशनना अनधिकृतरीत्या मतदान करण्याची परवानगी दिली. अनेक संकटांवर मात करत आम्ही ही निवडणूक सहजपणे जिंकली.

* अध्यक्ष, खजिनदार आणि सचिवपदासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली, याविषयी काय सांगाल?

३२ राज्य संघटनांपैकी अनेक संघटनांचा पाठिंबा आम्हाला अपेक्षित असल्याने आम्ही घवघवीत यश संपादन करू, याची खात्री होतीच. अध्यक्षपदासाठी कडवी लढत झाली तरी मी सचिवपदी निवडून येईन याची खात्री होतीच. खेळाडूंमध्ये तसेच प्रशासकांमध्ये माझी प्रतिमा चांगली असल्याने मी बाजी मारू शकलो.

* पुढील तीन वर्षांत भारतीय बुद्धिबळासाठी काय योजना आखल्या आहेत?

अनेक वर्षांपूर्वी आम्ही देशातील प्रत्येक शाळेमध्ये बुद्धिबळ हा खेळ पोहोचविण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. आता या तीन वर्षांत आम्ही ही योजना प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याचा आमचा विचार आहे. तसेच महिला बुद्धिबळपटूंसाठी विशेष योजना आम्ही तयार केली आहे. अधिकाधिक खेळाडू तयार करण्याकडे आमच्या कार्यकारिणीचा भर राहील. या खेळाकडे अधिकाधिक मुले आकर्षित व्हावीत तसेच खेळाडूंसाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

* इंडियन चेस लीगविषयी काय सांगाल?

इंडियन चेस लीग ही आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर भव्यदिव्य पद्धतीने ही लीग आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. २०१३ मध्येच आम्ही इंडियन चेस लीगची आखणी केली होती, पण गेल्या सात-आठ वर्षांत या योजनेला मूर्त रूप आम्हाला देता आले नाही. आता या वर्षी आम्ही इंडियन चेस लीगचे आयोजन करणार आहोत. मोठय़ा बक्षीस रकमेची ही लीग प्रत्यक्षात साकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. येत्या काही आठवडय़ांत आम्ही त्याविषयीची घोषणा करणार आहोत.

* करोनानंतरचे बुद्धिबळाचे चित्र कसे असेल?

केंद्र सरकारने स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता दिल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत आम्ही आगामी स्पर्धाची घोषणा करू. देशांतर्गत सर्व स्पर्धाचे वेळापत्रक आम्ही तयार केले आहे. फक्त सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. त्याचबरोबर जगातील अव्वल बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा भरवण्याची आमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.