News Flash

गैरसमजांमुळे खेळाच्या विकासाला खीळ

स्नूकर आणि बिलियर्ड्स म्हणजे श्रीमंतांचा खेळ असा समज आहे.

पंकज अडवाणी,आंतरराष्ट्रीय स्नूकरपटू

पंकज अडवाणी,आंतरराष्ट्रीय स्नूकरपटू
स्नूकर आणि बिलियर्ड्स म्हणजे श्रीमंतांचा खेळ असा समज आहे. हे खेळ सर्वसमावेशक असून कोणीही खेळू शकतो. या खेळांबद्दल समाजात गरसमज आहेत. ते दूर झाल्यास या खेळांची लोकप्रियता वाढेल, असा विश्वास चौदा विश्वविजेतेपदप्राप्त पंकज अडवाणीने व्यक्त केला. विक्रमी जेतेपद, सर्वोत्तमाचा ध्यास, अडथळे, दोन खेळ खेळताना होणारी कसरत, ऑलिम्पिकत्तेतर खेळांना मिळणारी वागणूक याबाबत पंकजने ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत.
’काही दिवसंपूर्वीच चौदावे विश्वविजेतेपद पटकावलेस, सातत्याने जिंकण्यासाठी स्वत:ला कसा प्रेरित करतोस? मी प्रत्येक सामन्यानुसार विचार करतो. प्रतिस्पर्धी खेळाडूचा सखोल अभ्यास करतो. अंतिम लढतीच्या वेळीही जेतेपदापेक्षा सर्वोत्तम खेळ करू शकलो का, हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा असतो. खेळात हारजीत होत असते, पण संघर्ष करणे चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे. जिंकण्याइतकेच खेळात सुधारणा झाली तरच समाधान मिळते. सुधारणेची आस जिंकण्याची प्रेरणा देते.
’प्रत्येक जेतेपदापर्यंतचा प्रवास खडतर असतो, आतापर्यंत कुठल्या जेतेपदाने सर्वाधिक समाधान दिले?
प्रत्येक विश्वविजेतेपद कसोटी पाहणारे असते, पण यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये कराचीत पटकावलेल्या जेतेपदाने अतीव समाधान दिले. एकाच दिवशी उपांत्य फेरीची लढत आणि अंतिम सामना होता. दोन सामन्यांमध्ये तीन तासांचे अंतर होते. मी ताप, सर्दी आणि कफ यांनी त्रस्त होतो. विश्रांतीदरम्यान डोकेही दुखू लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत संघर्षमय विजय मिळवल्यानंतर अंतिम लढतीत शांत राहिलो, शरीराची साथ नसतानाही प्रयत्न केला आणि जिंकलो.
’साधारणत: खेळाडू स्नूकर आणि बिलियर्ड्स यापैकी एकाचीच निवड करतात. तू दोन्हीत प्रावीण्य मिळवत विश्वविजेतेपद पटकावले आहेस? एकाच वेळी दोन्ही खेळांमध्ये वाटचाल करण्यामागे काय विचार होता?
२०१२ पर्यंत मी फक्त स्नूकर खेळत असे. बिलियर्ड्सही खेळू शकतो असा विश्वास वाटला. माझा भाऊ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ श्री तसेच प्रशिक्षक यांच्याशी चर्चा केली आणि दोन्ही खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. दोन्ही खेळ खेळणारे असंख्य खेळाडू आहेत, मात्र दोन्ही खेळांमधील वेळ आणि गुण प्रकारांत एकाच वेळी विश्वविजेतेपद पटकावणारा मी एकटाच आहे. दोन्ही खेळांच्या स्पर्धा खेळत असल्याने मेंदू थकण्याऐवजी ताजातवाना होतो. स्पर्धा, सराव यांचे वेळापत्रक जपताना कसरत होते. सतत प्रवास होतो. मात्र काही तरी आव्हानात्मक गोष्ट साध्य केल्याची भावना सुखावणारी असते.
’तुझ्या रूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्नूकर आणि बिलियर्ड्स क्षेत्रात भारताचा झेंडा फडकतो आहे. मात्र तरीही अद्याप देशात या खेळांची लोकप्रियता मर्यादित का आहे?
स्नूकर आणि बिलियर्ड्स श्रीमंत, लब्धप्रतिष्ठित वर्गाचा खेळ आहे अशी समजूत आहे. पण असे काहीच नाही. टेनिस, बॅडमिंटन या रॅकेट खेळांच्या तुलनेत स्नूकर-बिलियर्ड्सचे साहित्य स्वस्त आहे. खासगी जिमखाने आणि क्लब्ज यांच्या माध्यमातूनच हे खेळ खेळता येतात हे काही अंशी खरे आहे. परंतु देशभरात असंख्य शहरांमध्ये पूल पार्लर आणि स्नूकर टेबल्स उपलब्ध आहेत. खेळांभोवती असलेले गैरसमज दूर झाले तर प्रसाराला चालना मिळेल. शाळा आणि महाविद्यालय स्तरावर या खेळांचा समावेश झाला तर खऱ्या अर्थाने स्नूकर-बिलियर्ड्सच्या विकासाला गती मिळेल.
’सरकारचा स्नूकर आणि बिलियर्ड्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
ऑलिम्पिक खेळ नसल्याने स्नूकर-बिलियर्ड्स मागच्या रांगेत आहेत. ऑलिम्पिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या क्रीडापटूंबद्दल मला अत्यंत आदर आहे. पण या स्पर्धा चार वर्षांतून एकदाच होतात. स्नूकर-बिलियर्ड्सच्या स्पर्धा वर्षभर होत असतात. केवळ या खेळांचा ऑलिम्पिक, आशियाई-राष्ट्रकुल स्पर्धामध्ये समावेश नाही म्हणून सरकारचे धोरण बदलते.
खेळांविषयक धोरण सर्वसमावेशक असावे. सरकारकडून दिले जाणारे पुरस्कारही सर्व खेळांना सामावणारे असावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 6:25 am

Web Title: interview with pankaj advani
टॅग : Pankaj Advani
Next Stories
1 विश्वनाथन आनंदची पराभवाने सुरुवात
2 भारताचा हॉकीमध्ये मालिका विजय
3 पेले आले हो..! कोलकातामध्ये माजी महान फुटबॉलपटूचे जल्लोषात स्वागत
Just Now!
X