बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरुन राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुनही स्मिथला पायउतार व्हावं लागलं होतं. आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेला असताना, राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथऐवजी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्रीच क्लासेनला संघात समाविष्ट करुन घेण्याचं ठरवलं आहे. क्लासेनसोबत करार करण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे परवानगी मागितली असल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – VIDEO : Ball tampering प्रकरणात दोषी आढळलेल्या स्मिथची चाहत्यांनी उडवली हुर्यो

राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख झुबीन भरुचा यांनी यासंदर्भातली माहिती दिली. याचसोबत स्मिथच्या जागेसाठी जो रुट आणि हाशिम आमला यांचाही विचार झाल्याचं भरुचा यांनी सांगितलं. मात्र भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात क्लासेनने केलेली कामगिरी आणि भविष्यकाळात स्मिथला पर्याय म्हणून क्लासेन चांगली कामगिरी करु शकेल असा विश्वास संघ-व्यवस्थापनाने व्यक्त केलाय.

फिरकी गोलंदाजांना आत्मविश्वासाने सामना करेल अशा फलंदाजाची आम्हाला गरज होती. भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्यात क्लासेनने वन-डे व टी-२० सामन्यात भारताच्या फिरकीपटूंचा चांगला सामना केला होता. फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर स्विप, रिव्हर्स स्विप सारखे फटके क्लासेन अगदी सहज खेळू शकतो. त्यामुळे पुढील ३ वर्षांचा विचार करुन क्लासेनला संघात आणण्याचा आमचा मानस असल्याचं, भरुचा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं.

अवश्य वाचा – माझ्या कृत्याने आई-वडिलांना नाहक त्रास, पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथला रडू अनावर